
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
रिझर्व्ह बँकेचा विश्वास चिखली अर्बन बँकेवर असल्यामुळे आज जनता कमर्शिअल बँकेचे चिखली अर्बनमध्ये विलीनीकरण झाले व जे काम चिखली अर्बनने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट व ओबीसी महामंडळांतर्गत बेरोजगारांना कर्जवाटप करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी केले ते काम राष्ट्रीयीकृत बँकासुद्धा करु शकत नसल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री संजय कुटे यांनी खामगाव येथे केले.
खामगाव शहरातील जुनी जनता कमर्शिअल बँकेचे चिखली अर्बनमध्ये विलीनीकरण झाले. त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन संजय कुटे बोलत होते. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक जी. रमेश होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार आकाश फुंडकर, हभप संजय महाराज पाचपोर, खामगावच्या नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार उपस्थित होते.
यावेळी कामगार मंत्री संजय कुटे पुढे म्हणाले की, एका व्यक्तीने एकाच क्षेत्रात काम केल्याने प्रगती होते. सतिश गुप्त व त्यांचे सहकारी संघ परिवारातून असून त्यांनी सेवेचे व्रत घेतलेले आहे. त्यामुळेच बँकेची भरभराट होत असून बँकेचे संस्थापक स्व. भगवानदास गुप्त यांच्या जन्मशताब्दी वर्ष सुरु असून बँकेचे काम प्रशंसनीय व कौतुकास्पद सुरु आहे. संघाच्या विचाराच्या नागरी बँकेचे मोठे जाळे आपल्या जिल्ह्यात आहे. त्या बँकांही यशस्वी घोडदौड करीत आहे. आज संघाचा विचार देशभरात सर्वमान्य होत आहे. खुद्द शरद पवारांनी संघाचे कार्य मान्य केले आहे. असे सांगून महाराष्ट्रातील कामगारांचे वेतन दुप्पट केल्याची माहिती कुटे यांनी यावेळी दिली. तर या सोहळ्याचे उद्घाटक रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक जी. रमेश यांनी आपल्या भाषणात जनता कमर्शिअल बँकेचे चिखली अर्बनमध्ये विलिनीकरण हे माईल्ड स्टोन सारखे काम झाले आहे. चिखली अर्बनची जबाबदारी आता वाढली असून ही बँक व अध्यक्ष गुप्त ही जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडून खामगावातील जनतेचा विश्वास संपादन करेल यात शंका नाही. विदर्भात चिखली अर्बन बँकेचे काम उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा देखील यावेळी रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक रमेश यांनी दिला. तर हभप संजय महाराज पाचपोर यांनी आपल्या भाषणात देशाची समृद्धी कायम ठेवण्यासाठी जलदुर्ग, पर्वतदुर्ग, वनदुर्ग, धनदुर्ग मजबूत असायला पाहिजे. अन्याय असतो तिथे न्याय व्यवस्था असते. रामायणात अन्याय नव्हता म्हणून न्याय व्यवस्था नव्हती. अर्थाशिवाय माणसाला किंमत नाही म्हणून प्रत्येकाच्या घरात एक क्विंटल सोनं असायला पाहिजे. परंतु सोन्यासोबत संस्कृती असली पाहिजे. संस्कृती व श्रीमंती जोपासण्याचे काम चिखली अर्बन बँक करत आहे. तेव्हा या बँकेवर खामगावातील जनतेने विश्वास ठेवावा. बँक तुमचा विश्वास सार्थ ठरवेल असेही हभप पाचपोर महाराज म्हणाले.
यावेळी आमदार आकाश फुंडकर म्हणाले की, रजतनगरी खामगावात मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो असून ‘विना सहकार नाही उद्धार’ म्हणीप्रमाणे एकमेकास मदत करुन चिखली अर्बन बँक जनतेशी सामाजिक बांधिलकी जपत या शहरात यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला. बँक अध्यक्ष सतिश गुप्त यांनी आपल्या मनोगतामध्ये जनता कमर्शिअल बँकेचे आता चिखली अर्बन बँकेत विलिनीकरण झाले आहे. तेव्हा कर्जदारांनी कर्ज भरावे आम्ही त्याना मुदत देवू व भरले नाही तर कारवाई करु. ठेवीदारांचा पैसा बँकेत सुरक्षित आहे व राहील असा विश्वास देत खामगावातील जनतेने २९ जुलै सोमवारपासून चिखली अर्बन बँकेत व्यवहार सुरु करावे असे आवाहन केले.
























































