आग भडकवू नका! मेहबुबांचे फूत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

केंद्र सरकार कश्मीरमधील  ‘कलम-35अ’ हटवण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर या कलमाला हात लावाल तर भडका उडेल. उगीच आग भडकवू नका, असे हिरवे फूत्कार काढले आहेत जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा  मेहबुबा मुफ्ती यांनी. पीडीपीला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुफ्ती यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘कलम-35अ’ला संरक्षण देण्याच्या उद्देशाने मोठ्या लढ्यासाठी तयार राहण्याचे आदेश पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, ‘कलम-35अ’अंतर्गत जम्मू-कश्मीरमधील मूळ रहिवाशांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

‘कलम-35अ’ला हात लावाल तर जळून खाक व्हाल, अशा शब्दांत मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला इशारा दिला. जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्याचा निर्धार केल्याचेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकारलाही याची कल्पना आहे. जम्मू-कश्मीरमध्ये केवळ पीडीपी हाच एकमेव पक्ष आहे जो जम्मू-कश्मीरमधील जनतेच्या अधिकारांसाठी मजबूत भिंत बनून उभा राहू शकतो, असेही मुफ्ती यावेळी म्हणाल्या.