परळ-प्रभादेवीचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एल्फिन्स्टन रोडवर जेथे 29 सप्टेंबर 2017 रोजी चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा बळी गेला होता त्या पुलाचा पश्चिमेकडील भाग दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येथे नवा पादचारी पूल बांधण्यासाठी किमान सहा महिने लागणार असल्याने पूर्वेकडून येणाऱया पादचाऱयांना वळसा मारून प्रभादेवीच्या दिशेने पुन्हा यावे लागणार आहे.

सीएसएमटीला जोडलेल्या ‘हिमालय’ पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने मजबूत गर्डर नसलेले सर्व जुने पूल हटविण्याचा निर्णय घेतला आहे. हा जुना पूल परळ आणि एल्फिन्स्टन रोड (आताचे प्रभादेवी ) दोन्ही स्थानकांना जोडलेला होता. तो 32 मीटर लांब आणि पाच मीटर रुंदीचा असून सन 1972 रोजी बांधलेला होता. येथे आता 2.25 कोटी रुपये खर्च करून नवा सहा मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

3 जुलै 2018 रोजी अंधेरी स्टेशनजवळील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्याची घटना घडल्यानंतर आयआयटीच्या मदतीने रेल्वे पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेचे पंधरा पादचारी पूल पाडण्याचा अहवाल ‘आयआयटी’ने दिला होता. पश्चिम रेल्वेने 6 ते 12 मीटर रुंदीचे डेक असलेले नवे पादचारी पूल त्यांच्या जागेवर बांधण्याचे काम हाती घेतले. असे सहा पादचारी पूल यापूर्वीच मरीन लाइन्स, लोअर परळ, वांद्रे, मालाड, नायगाव, नालासोपारा या स्थानकांत बांधण्यात आले आहेत. इतर पुलांना पर्यायी पूल बांधण्याचे काम आठ स्थानकांत सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

23 पादचारी पुलांची दुरुस्ती सुरू
आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर विविध स्थानकांत 23 पादचारी पूल दुरुस्तीसाठी पूर्ण किंवा अर्धवट बंद करण्यात आले आहेत. ग्रँट रोड, महालक्ष्मी, विलेपार्ले आणि मालाड या स्थानकांत डेक रिपेअरिंगचे काम सुरू आहे तर चर्नी रोड, माहीम, दादर, खार रोड आणि बोरिवली या स्थानकांत पादचारी पुलांच्या पायऱया दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.