संयम, निर्भयतेमुळे ‘चांद्रयान-2’यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

‘चांद्रयान-2’ ही आपली मोहीम आहे… पूर्णपणे स्वदेशी आहे… संयम आणि निर्भयतेमुळेच ही मोहीम यशस्वी झाली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, चंद्रावरील जाण्याच्या मोहिमेच्या शास्त्रज्ञांना सुरुवातीला काही बिघाड आढळले. त्यामुळे मोहीम अखेरच्या क्षणी रद्द करावी लागली मात्र आठवडाभरातच त्यांनी हे सर्व बिघाड दुरुस्त केले आणि त्यानंतर मोहीम यशस्वी झाली. या शास्त्रज्ञांचे हे काम केवळ अद्वितीय आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हे अडथळे पार केले त्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रशंसाही मोदींनी यावेळी केली. या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान देशवासीयांशी संवाद साधतात. ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या कार्यक्रमाचे 53 भाग प्रसारित झाले. यावेळच्या कार्यकाळात त्यांचा हा दुसरा कार्यक्रम आहे.

बंदूक, बॉम्बपेक्षा विकास महत्त्वाचा
बंदूक आणि बॉम्बपेक्षा विकासाची ताकद अधिक महत्त्वाची आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात विकासाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, जम्मू-कश्मीरमधील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात यायची इच्छा आहे. ‘बॅक टू व्हिलेज’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक ज्येष्ठ सरकारी अधिकारी गावागावात गेले. तेथे ग्रामस्थांनी अधिकाऱयांना आपापल्या समस्या सांगितल्या. बंदूक व बॉम्बद्वारे जे लोक द्वेष पसरवत आहेत त्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही. विकासाची ताकद खूप मोठी आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना लँडिंग अनुभवता येणार!
देशातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी ओढ वाढावी यासाठी पंतप्रधान मोदींनी एका प्रश्नोत्तराच्या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ‘मन की बात’मध्ये जाहीर केले. या स्पर्धेत चांगले मार्क्स मिळविणाऱया विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने सप्टेंबरमध्ये ‘चांद्रयान-2’ची चंद्रावरील लँडिंग पाहायला श्रीहरिकोटा येथे नेण्यात येणार आहे. याबाबत आणखी माहिती लवकरच प्रसिद्ध होईल, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.