
सामना प्रतिनिधी । मुंबई
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षकपद रिकामे झाले आहे. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा वेस्ट इंडीज दौर्यापर्यंत कार्यकाल वाढविण्यात आला आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू केली, मात्र क्रिकेट सल्लागार समितीवरील नव्या सदस्यांनी अद्यापि शपथपत्र दिलेले नसल्याने ‘टीम इंडिया’ला नवीन प्रशिक्षक मिळण्यास विलंब होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रशासकीय समितीच्या (सीओए) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांना परस्पर हितसंबंधाबाबत शपथपत्र देणे बंधनकारक आहे, मात्र नव्या सदस्यांनी अद्यापि शपथपत्र दिलेले नाही. जुन्या सल्लागार समिती सदस्यांबाबतही हा वाद झाला होता. सल्लागार समिती सदस्य जोपर्यंत शपथपत्र देत नाहीत तोपर्यंत ते नवीन प्रशिक्षकाबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. नव्या सल्लागार समितीतील काही सदस्य समालोचक आहेत, काहींची स्वतःची क्रिकेट अकादमी आहे. त्यामुळे ‘सीओए’ला या सर्वांकडून लवकरात लवकर शपथपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच प्रशिक्षकपदाची प्रक्रिया सुरू होणार आहे. याचाच अर्थ या तांत्रिक मुद्दय़ामुळे हिंदुस्थान संघाला प्रशिक्षक मिळण्यास उशीर होणार एवढे नक्की.




























































