
सामना प्रतिनिधी । मुंबई
थर्माकोलबंदीमुळे गणेशभक्तांची पावले आता पर्यावरणपूरक देखाव्यांकडे वळू लागली आहेत. दरवर्षी देखाव्यांचे नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात. बाजारात यंदा सगळ्यांचे लक्ष वेधलेय ते इरकली साड्यांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक देखाव्याने. भाविकांना अवघ्या पाच मिनिटांत हा देखावा उभारता येणार आहे. या झटपट आणि आकर्षक देखाव्याची संकल्पना आहे लालबागच्या संदेश गावकर या तरुणाची.
पेशाने कमर्शियल आर्टिस्ट असलेला संदेश गावकर गेल्या चार वर्षांपासून ‘सर्वांगी आर्ट्स’ या बॅनरखाली पर्यावरणपूरक देखावे तयार करतोय. यात त्याला त्याची पत्नी श्रद्धा आणि आईवडिलांची साथ मिळते. पारंपरिक इरकली साडी आणि चोळीपासून देखावे तयार करण्याची संकल्पना श्रद्धा गावकर यांना सुचली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम संदेशने केले. घेऊन जाण्यासाठी सहज आणि अवघ्या पाच मिनिटांत हा देखावा उभारता येईल त्यामुळे भाविकांची या देखाव्याला पसंती मिळत आहे. केवळ तीन हजार रुपयांत हे देखावे उपलब्ध आहेत. सध्या ठाण्याच्या कलाभवन येथे या देखाव्यांचे प्रदर्शन सुरू असून ऍमेझॉनवरून देखील खरेदी करता येईल. महाराष्ट्रातून नाही तर ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतून मखरांची विचारणा होत असल्याचे संदेश गावकर यांनी सांगितले.
इरकली साडीपासून 4 बाय 3 फुटाचा लखोटा तयार केला आहे. त्यावर ‘सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची’ हे कॅलिग्राफीने लिहिलेले आहे. वरच्या बाजूला बांबूपासून बनवलेली छत्री आहे. बाप्पाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी चोळी, मणी आणि लटकन याचा वापर करून आकर्षक लोड तयार केले आहेत. विविधरंगी पर्यायात हे मखर उपलब्ध आहेत.





























































