अंतोरे गावातील 64 जणांची बचाव पथकाकडून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पेण

मुसळधार पावसाने पेण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर येऊन घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेण तालुक्यातील अंतोरे गावामध्ये झालेल्या जोरदार पाऊसने अंतोरे बंदर येथील मुस्लिम वस्तीत पाणी शिरले. पावसाचा जोर वाढल्याने ग्रामस्थांना धोका निर्माण झाल्याने बचाव पथकाने गावातील 64 तरुण, महिला वर्ग तसेच वृद्ध व्यक्तींना सुखरूप स्थलांतरित केले.

पेण तालुक्यातील अंतोरे हमरापूर ताबंशेत,वाशी, वढाव, कणे, यासह खारेपाट विभागात पूर आल्याने ग्रामस्थांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पेण शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील कोळीवाडा, चिंचपाडा, विठ्ठल आळी, एसटी स्डँन्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मागील पाच दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे हेटवणे धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला चांगलेच झोडपून काढल्याने तालुक्यातील भोगावती नदी, भुंडा पूल, हेटवणे धरण दुथडी भरुन वाहत आहेत. ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यासाठी पेणचे तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, पोलिस निरीक्षक काटकर, दादर सागरी पोलिस निरिक्षक पवार, सरंपच अमित पाटील, उपसरपंच राजेश कांबळे, माजी सरपंच राजा पाटील, पो.पा.समिक्षा रणपिसे यांनी सहकार्य केले.