
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोबाईल ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देणाऱया टेलिकॉम कंपन्यांच्या शर्यतीत भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) एक पाऊल मागे घेतले आहे. बीएसएनएलने प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलिमिटेड कॉलिंगऐवजी आता ग्राहकांना दररोज केवळ 250 मिनिटे कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
जिओ, एअरटेलसारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्लॅन जारी करून ग्राहकांना आकर्षित करणाऱया बीएसएनएलने आता माघार घेतली आहे. टेलिकॉमटॉकने दिलेल्या वृत्तानुसार बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंग बंद केले आहे. बीएसएनएलच्या ज्या ग्राहकांकडे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असलेले प्लॅन आहेत त्या ग्राहकांना दररोज 250 मिनिटे म्हणजेच 4 तास 10 मिनिटे मोफत कॉलिंगची सुविधा असणार आहे. त्यानंतर ग्राहकांना प्रतिसेकंद 1 पैसा मोजावा लागेल.
– बीएसएनएलच्या प्रीपेड प्लॉन्सवर हे नियम लागू असतील. सध्या 186 रुपये, 429 रुपये, 666 रुपये आणि 1 हजार 699 रुपयांचे प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत.
– गेल्या काही काळापासून बीएसएनएल तोटय़ात आहे. कर्मचाऱयांचे वेतन देण्यातही कंपनी असमर्थ आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद केली आहे.




























































