लातूर जिल्ह्यात पाऊस पडावा यासाठी पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

कायम दुष्काळात होरपळणाऱ्या लातूरकरांची भिस्त आता वेधशाळेच्या अंदाजावर राहिलेली नाही. संभाव्य भीषण दुष्काळ टाळण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास केवळ देवावरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वत्र देव, देवतांना साकडे घातले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे भव्य पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू केला आहे तर लातूर तालुक्यातील पेठ शिवारातील महादेव मंदिरात कांहीजणांनी पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू केला आहे.

कायम दुष्काळाच्या छायेत असणारा लातूर जिल्हा दुष्काळातून मुक्त होण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी भावना तमाम लातूरकरांची असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातूनच इतर ठिकाणचे पाणी लातूर जिल्ह्यात आणले तरच हा भाग दुष्काळमुक्त होऊ शकतो. यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीस वेधशाळांचे अंदाज यावर्षी भरपूर पाऊस पडणार असेच होते. लातूर जिल्ह्यात मात्र कुठेच पाऊस पडला नाही. आजपर्यंत केवळ 30 टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात खरीपाची पेरणीही होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे जी पेरणी झालेली आहे ती अवेळी झाल्यामुळे केवळ पेरणी केल्याचे समाधान शेतकऱ्यांना मिळणार असून उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे कृषी अधिकारी आणि कृषीचे जाणकारही सांगत आहेत.

खरीप हंगाम तर गेलेला आहेच परंतु येणारा रब्बी हंगामही धोक्यातच आहे. पाऊसच पडला नाही तर जिल्ह्यात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता केवळ दैवावर विश्वास ठेऊनच लातूरकर जीवन जगत आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी निलंगा येथे कांही कोटी रुपये खर्च करून पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू केला आहे. तर लातूर तालुक्यातील पेठ जवळ असणाऱ्या नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ काही जणांनी स्वयंस्फूर्तीने पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू केला आहे. ज्याला जसे जमेल तसे पाऊस पडावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. मुस्लीम धर्मियांच्या वतीने वतीने इदगाह मैदानावर पावसासाठी सामूहिक नमाज अदा करण्यात आली परंतु अजूनही जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊसच झालेला नाही.

जिल्ह्यातील अनेक गावातील महादेव मंदिराचे गाभारे नागरीकांनी पाऊस पडावा म्हणून पाण्याने भरून टाकले. परंतु त्याचाही अधिक फायदा झाल्याचे दिसून आले नाही. अनेक प्रयोग करूनही पाऊस पडत नसला तरी लातूरकरांची आता सर्व भिस्त ही दैवावरच असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.