
सावजाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाला तीन दिवसांनंतर निफाड वन विभागाच्या वतीने त्याच्या मातेच्या स्वाधीन केले असून ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱयाने कैद केली आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यात वनविभागाच्या वतीने चौथ्यांदा बिबटय़ाच्या बछडय़ाला मातेकडे सुपूर्द करत तिच्या हिंस्र होण्यापासून वन विभागाने वाचवले आहे.
गाजरवाडी, तालुका निफाड हे शिवार नांदूर मधमेश्वर धरण परिसराला लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मोठय़ा संख्येने बिबटय़ांचा वावर आहे. अशातच येथील प्रतापराव पुंड यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये सावजाच्या शोधामध्ये पाच महिने वयाचे बिबटय़ाचे बछडे पडलेले होते. वन विभागाच्या वतीने त्यास रेस्क्यू करून 10 ऑगस्ट रोजी बाहेर काढले होते. त्यानंतर बिबटय़ाच्या मादीचा गाजरवाडी परिसरातील गावकऱयांना त्रास नको म्हणून सदरच्या पिल्लाला स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एक खड्डा खोदून त्यावर जाळी ठेवण्यात आली. बाजूलाच काही अंतरावर ऐका पिंजऱयात वनविभागाचे कर्मचारी बिबटय़ावर लक्ष ठेवून होते. वनविभागाची टीम बिबटय़ाच्या पिल्लाला मादीकडे देण्यासाठी झटत होते. मात्र, मादी रोज घटनास्थळी येऊन जात होती, परंतु पिलास नेत नव्हती, तसेच पिल्लू मोठे असल्याने ते तसेच सोडणे धोक्याचे होते. त्यामुळे वनविभागाच्या टीमने पिल्लू ताब्यात कसे देता येईल याचे नियोजन केले. कारण आधी लावलेल्या कॅमेऱयात मादीचा आधिवास स्पष्ट होत नसल्यामुळे पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ताटातूट झालेल्या बिबटय़ाच्या मातेची आणि बछडय़ाची भेट घडवून आणण्यात वनविभाग यशस्वी ठरला.
शेतकरी आणि नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गाजरवाडीत विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला आमचे पथक तीन दिवसांपासून त्याच्या आईकडे देण्यासाठी तप्तर होते. परंतु मादी केव्हा येते हे स्पष्ट होत नसल्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयपी कॅमेरा सीसीटीव्ही यंत्रणा विकत घेऊन त्याद्वारे ताटातूट झालेल्या माय लेकरांची भेट घडवून आणू शकलो. त्याचे रेकार्ंडगसुद्धा उपलब्ध झाले आहे.
– संजय भंडारे, वनअधिकारी




























































