
रत्नागिरीतील पोलीसांच्या वसाहतींकरीता 155 कोटींची तरतूदीबरोबरच कोल्हापूर- सांगलीतील पुरग्रस्तांच्या अंशतः नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद, दापोली येथील 300 घरे, चिपळूण येथील 412 घरे आणि नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नावाने नाट्यगृह उभारण्याचे महत्वाचे निर्णय सोमवारी रत्नागिरीत झालेल्या म्हाडा प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात म्हाडा प्राधिकरणची बैठक सोमवारी पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयांची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी सुधारमंडळाचे सभापती विजय नाहटा, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, नागपूर मंडळाचे सभापती तारीक कुरेशी आणि प्रभारी नगराध्यक्ष प्रदिप साळवी उपस्थित होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुरात अंशतः नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद बैठकीत करण्यात आली. हे 10 कोटी रुपये आम्ही पुणे मंडळाकडे वर्ग करणार आहोत. पूर्णतः कोसळलेल्या घरांना शासन 95 हजार रूपये मदत करते. साधारण 2 हजार घरांना मदत करण्याचे आमचे उददीष्ट असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच म्हाडाचे कर्मचारी एक दिवसांचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील पोलीस वसाहतीसाठी 155 कोटी रुपयांची तरतूद बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर दापोलीतील 300 घरे, चिपळूण येथे 412 घरे आणि नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. चिपळूणातील जनतेच्या मागणीनुसार या नाट्यगृहाला नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे नाव दिले जाईल असे आमदार सामंत यांनी जाहीर केले. कलावंत आणि पत्रकारांनी घरासाठी म्हाडाकडे मागणी केली होती. ती ही बैठकीत पूर्ण करण्यात आली. 300 घरे कलाकारांसाठी 200 घरे पत्रकारांसाठी, 200 घरे म्हाडाच्या कर्मचार्यांसाठी आणि 200 घरे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिली जाणार आहेत असे आमदार सामंत यांनी यावेळी सांगितले. कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी कोकण पट्यात पालघर, ठाणे, विरार या परिसरात म्हाडा घरे उभारत आहे. मुंबईत नोकरीसाठी येणारे लोक त्या भागात मोठ्या संख्येने राहतात. सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने घरांची मागणी आली तर आम्ही उभारु असे आश्वासन त्यांनी दिले.



























































