
>> डॉ. सच्चिदानंद शेवडे
श्रीलंका आणि हिंदुस्थान यांचा परस्पर संबंध अगदी रामायणापासून आहे. त्यामुळे श्रीलंकेतील पर्यटनात हिंदू संस्कृती आणि रामायणाचा इतिहास जागा होतो. मात्र बौद्धमयी श्रीलंकेत आपल्या या उत्साहाचा काहीसा हिरमोड होतो. रामायणाशी संबंधित ठिकाणे नक्कीच तेथे आहेत, पण त्यावरही तेथील संस्कृती आणि सरकारी धोरणांचा पगडा दिसतो. रामायणाशी संबंधित किमान 43 ठिकाणे श्रीलंकेत आहेत असे सांगितले जाते, पण एकाही ठिकाणी त्याची ओळख, नाव अथवा परिचय दिसत नाही. गेल्या आठवडय़ातील श्रीलंका भेटीत या वास्तवाचा अनुभव आला.
आपल्या शेजारच्या आणि सांस्कृतिक वीण घट्ट असलेल्या श्रीलंकेतून गत सप्ताहात परतलो. तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा लंकादर्शन घेतले होते. त्यानंतर ‘शोध श्रीलंकेचा’ हे इतिहास आणि वर्तमानाचा वेध घेणारे माझे पुस्तकही प्रकाशित झाले. श्रीलंका हा बौद्ध देश असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला सर्व आस्थापनांना सार्वजनिक सुट्टी असते. वर्षातून प्रत्येकी तीन बौद्ध, हिंदू आणि मुस्लिम सणांना सुटी असते. हिंदू हे संख्येने दुसऱया क्रमांकावर असूनही त्यांचे कोणतेही लाड पुरवले जात नाहीत.
अगदी चौकाचौकांत बुद्धमूर्ती दिसतात. काही तर फार विशाल म्हणजे 25-30 फुटांच्या असतात. मार्गातील टेकडय़ांवरसुद्धा मोठय़ा मूर्ती दिसतात. मंदिरे मात्र अभावाने आढळतात. अर्थात श्रीलंकेत बहुतेक हिंदू स्थानांवर बौद्ध कब्जा व पगडा दिसतो.
बहुतेक मुख्य हिंदू मंदिराच्या जागी बुद्ध येऊन गेले वा जेवले अथवा झोपले होते अशा कथा सांगून भव्य स्तूप असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे तेथील रामायण सोसायटीला काम करणे व रामायणासंबंधित स्थाने शोधणे नक्कीच जिकरीचे जात असणार. याला अपवाद म्हणजे नुवारा एलिया या रम्य थंड हवेच्या ठिकाणी असलेले सीता अम्मन टेम्पल होय. या मंदिरात राम-सीता-लक्ष्मण यांच्या सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी सापडलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला सीता व हनुमंत यांची भेट झाल्याचे शिल्प उभे आहे. त्याच्या समोर असलेल्या दोन पावलांच्या आकाराच्या मोठय़ा खळग्यांना हनुमंताची पदचिन्हे म्हणून दाखवले जाते. तेथून जवळ असलेल्या राम्बोडा या ठिकाणी हनुमंताचे मंदिर आहे. तिथे काळ्या पाषाणातील त्याची सुरेख मूर्ती उभी असलेली दिसते. सध्या चिन्मय मिशन त्याची देखरेख करीत आहे. रामायणाशी संबंधित किमान 43 स्थाने श्रीलंकेत असल्याचे सांगितले जाते. पण एकाही ठिकाणी ओळख, नाव वा परिचय नाही. पर्यटकांमुळे त्यांना (श्रीलंकेला) राम सोडवतही नाही व धरवतही नाही अशी विचित्र अवस्था आहे. दिवुरुमवेला या स्थानी सीतेने अग्निपरीक्षा दिली असे तिथे सांगितले जाते. तिथे एका आम्रवृक्षात कोरलेली हनुमान मूर्ती आहे. पुढच्या छोटय़ा खोलीत सीतेची मूर्ती व काही भित्तिचित्रे आहेत. खोलीच्या मागे एक स्तूप आहे. तिथे म्हणे सीतेचे अलंकार पुरून ठेवले आहेत. दर्शनी भागात असलेल्या मंदिरात सर्वत्र केवळ बुद्धमूर्तीच दिसतात. तेथील भित्तिचित्रात बुद्धचरित्रातील काही प्रसंग आणि चक्क रामायणातील दोन-चार चित्रे होती. त्यात लंकादहनाचे एक चित्र होते. बाकी देव-देवतांच्या कपाळी साधारणतः गंध अथवा कुंकू नसतेच. तेथील अन्य दोन हिंदू मंदिरे बंदच असतात. गाईडला वारंवार सांगितल्यावर उघडण्याची सोय झाली. आत पडद्यावरील चित्रे पाहिली आणि ज्या मूर्ती होत्या त्या अनोळखी होत्या.
दोवा गावांत रावण गुंफा आहे. त्याला राजमहा विहाराया म्हणतात. आत सर्वत्र बुद्धमूर्ती आणि भित्तिचित्रे होती. दोन कोपऱयात चक्क कपाटासारख्या जागा होत्या आणि त्यावर लटकणारी चित्रे होती. मूर्ती नसल्यामुळे दिवा, हार अथवा कोणत्याही प्रकारच्या पूजेची सोय नाही.
दोवाहून कातरगामाकडे निघालो. वाटेत रावण यल्ला नामक धबधबा आहे. त्याला रावणाचे नाव का दिले आहे ते बिचारा गाईडही सांगू शकला नाही. मार्गात रस्त्यावर एका गजराजाने दर्शन दिले. कातरगामा येथे मोठे देवालय आहे. माणेकगंगा नदी ओलांडून आपण गावात शिरतो. डावीकडे विष्णू, कार्तिकेय मंदिरे म्हणजे चित्रे आहेत, पण तिथेही बुद्धाचा मोठा पुतळा आहे. त्यावेळी मंदिर बंद होते. ते पहाटे साडेचार, सकाळी साडेदहा आणि सायंकाळी साडेसहा यावेळी केवळ पूजेसाठी उघडले जाते असे सांगण्यात आले. त्या जवळील स्तूप व बुद्धमंदिर मात्र खुले असते. तिथे जाफनावासी तामीळ भेटला. आमच्या इथे तुम्हाला मूर्ती दिसतील, बाकी ठिकाणी कमीच दिसतील असे सूचक बोलला. जाफना हा हिंदूबहुल भाग आहे. श्रीलंकेत हिंदुस्थानी व त्यातही हिंदू पर्यटक जास्त जातात.
हे सर्व अनुभवताना आपल्याकडील अल्पसंख्याकांच्या सुविधा आणि श्रीलंकेतील अल्पसंख्य हिंदू यांची मनात सहज तुलना झाली.

























































