आंबडोस गावात स्वाभिमान पक्षाला धक्का, माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण येथे शिवसेनेने आमडोस गावात स्वाभिमान पक्षाला जोरदार धक्का दिला. माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आंबडोस गावाला राज्यस्तरावर नावलौकिक प्राप्त करुन देणारे व आंबडोस गावामध्ये अनेक वर्ष सरपंच पद भुषविलेले दिलीप परब, माजी सरपंच दिगंबर नके व ग्रामपंचायत सदस्य दयानंद पाटकर, बाबू अर्जून परब यासह विजय नाईक, बाळा पवार, ओमप्रकाश चव्हाण, राजेंद्र परब, रामकृष्ण परब, गोपाळ धुरी, बबन कदम, बाबी धुरी (मुंबई मंडळ माजी अध्यक्ष), बाळा नाईक यांच्यासह आंबडोस मधील देवस्थानचे प्रमुख मानकरी, शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला.

यावेळी जि.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुका प्रमुख हरि खोबरेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. प्रविण सावंत, संजय गावडे, शाखा प्रमुख विशाल धुरी, बाळा महाभोज, युवा सेनेचे मंदार शिरसाट, मंदार गावडे, बाबी जोगी, विजय पालव व अन्य पदाधिकाारी उपस्थित होते. हरि खोबरेकर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या मंडळीचे स्वागत केले. जि.प. शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी प्रवेश करणारी स्वाभिमानची मंडळी ही शिवसेनेमध्ये स्वगृही दाखल होत आहे. त्यामुळे शिवसेनेची कार्यपद्धती या मंडळीला नवीन नाही. त्यामुळे आता आंबडोस गावामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होऊन निश्चित या सर्वांना न्याय देवून गावचा विकास निश्चित केला जाईल असे सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेमध्ये सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला जाईल. आंबडोस गावामध्ये तसेच आंबडोस दशक्रोशीमध्ये दिलिप परब, दिगंबर नके यांच्या माध्यमातून शिवसेना संघटनेचा विस्तार शतप्रतिशत होवून विकास कामे निश्चितपणे मोठया प्रमाणात केली जाणार आहेत. असे सांगत शिवसेना युती शासनाच्या माध्यमातून आमदार निधीतून झालेल्या कामाची माहिती दिली.

खासदार विनायक राऊत म्हणाले शिवसेना पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणी मोठे नेते नसून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करणारे जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत. आणि हीच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. आपल्या सूचना व मतांचा आदर राखला जाईल. विकासाची गंगा तळागळातील शेवटच्या स्थरातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यत पोहोचवून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असून मालवण तालुका शतप्रतिशत भगवामय केला जाणार आहे. आपल्या सारख्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांना विक्रमी मताधिक्याने आमदार म्हणून निवडूण येणारच आहेत तसेच त्यांना भविष्यामध्ये निश्चितपणे रवळनाथाच्या कृपेने त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. स्वाभिमान पक्षावर आम्ही टिका करु इच्छित नाही त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत चाललेले आहेत. असेही खासदार म्हणले.