
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही तासांनी होण्याची शक्यता असली तरी या निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्यांचा उत्साह मात्र निवडणुकीपूर्वीच मावळल्याचे चित्र राजधानीत दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली मेगागळती हे यामागचे प्रमुख कारण असले तरी दुसरे एक तगडे कारणही इच्छुकांची भाऊगर्दी ओसरण्यास कारणीभूत आहे ते म्हणजे पितृपंधरवडा. काँग्रेसची अवस्था अगोदरच दयनीय झालेली असताना नेमक्या पितृपक्षातच स्क्रीनिंग कमिटीच्या बैठका असल्याने निवडणुकीची पूर्ण प्रक्रियाच पितृपंधरवडय़ात पूर्ण होणार असल्याने इच्छुकांनी नसती आफत नको म्हणून दिल्लीकडेच पाठ फिरवणेच पसंत केले आहे.
काँग्रेसचे प्रभारी जाहीर
दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विभागांच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. विदर्भ विभागासाठी मुकुल वासनिक, मुंबई विभाग व निवडणूक नियंत्रण कक्षाच्या प्रभारीपदी अविनाश पांडे, पश्चिम व कोकण विभागासाठी रजनी पाटील, उत्तर महाराष्ट्र आर. सी. खुनतिया तर मराठवाडा विभागासाठी राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या 50 उमेदवारांची पहिली यादी 20 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस 125, राष्ट्रवादी 125 आणि मित्रपक्ष 38 जागांवर लढणार आहे.
मित्रपक्षांना हव्यात 60 जागा; 38चा फॉर्म्युला मान्य नाही
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 125-125 तर मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र मित्रपक्षांना हा फॉर्म्युला मान्य नाही. 55 ते 60 जागांची मागणी मित्रपक्षांकडून करण्यात येत असून ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जागावटपाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडी आदी मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.






























































