
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील प्रस्तावित भूखंडावरून विरोध वाढताना दिसत आहे. अभिनेता जॉन अब्राहम यानेही यात आता उडी घेतली असून त्याने विकासाला विरोध नाही, पण आरे वाचवायलाच हवं, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
जॉन हा जन्मजात मुंबईकर आहे. ”आरे हे निव्वळ शहरी भागातलं जैवविविधता असलेलं एक जंगल नाही तर ती मुंबईची फुफ्फुसं आहेत. त्यामुळे आपल्याला त्याविरुद्ध उभं ठाकायलाच हवं, बोलायलाच हवं आणि सगळ्यांनी मिळून विरोध करायला हवा. आमचा विरोध विकासाला नाही, मेट्रोलाही नाही. फक्त त्यासाठी आरे किंवा अन्य कोणत्याही जंगलाचा बळी देण्याला आहे. आरे वाचवा, मुंबई वाचवा.” असं ट्वीट करत जॉनने आरे वाचवा मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
दुसरीकडे, अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घाटकोपर ते वर्सोवा असा प्रवास केला. मुंबईतल्या वाढत्या ट्रॅफिक समस्येवर मेट्रो हा प्रवासाचा उत्तम मार्ग असल्याचं मतही त्याने व्यक्त केलं आहे.




























































