
वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणारे खासदार अमर सिंह यांनी लाच प्रकरणात तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांना ‘तुरुंगात कसे वाटते’ असे विचारत खिजवले आहे. इतिहासाची नेहमीच पुनरावृत्ती होत असते, असेही ते म्हणाले.
2008मध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार वाचवण्यासाठी राज्यसभेचे खासदार असलेल्या सिंह यांनी तिघा खासदारांना मनमोहन सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच दिली होती. मात्र, त्यांना या प्रकरणात 2011मध्ये तिहार तुरुंगाची हवा खावी लागली. चिदंबरम त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री होते. काँग्रेसला याची आठवण करून देत अमर सिंह यांनी ट्विट करत म्हटले, ‘पी. चिदंबरम यांच्याबद्दल मला प्रचंड सहानुभूती आहे. माझी किडनी ट्रान्सप्लॅन्ट करून मी देशात परत आलो त्यावेळी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी मी मदत केली. मात्र, माझी ही मदत लक्षात न घेता काँग्रेसने मला तुरुंगात पाठवले. मीही त्यावेळी लादीवर उशीशिवाय झोपलो होतो. आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तुरुंगात तुम्हाला कसे वाटते?’ असा प्रश्न करून चिदंबरम यांना चांगलेच खिजवले.

























































