महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंरत आता साऱ्या देशाचे लक्ष शिवसेना-भाजपकडे महायुतीकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी देखील पत्रकारांनी हाच प्रश्न उपस्थिती केला. त्यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते.
खरंतर पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी जाहीर केलल्या निर्णयाचे त्यांनी जोरदार स्वागत केले. या निर्णयाचा महाराष्ट्राला कसा फायदा होईल, गुंतवणूक कशी वाढेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी घेतलेल्या निर्णयापैकी कॉर्पोरेट कर कमी करण्यासंदर्भातील निर्णय सगळ्यात मोठा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढणार असून महराष्ट्राला त्याचा मोठा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्रात यामुळे मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यानंतर यासंदर्भात काही प्रश्न विचारण्यास पत्रकारांना मोकळीक देण्यात आली.
ही संधी मिळताच पत्रकारांनी आर्थिक निर्णयांसदर्भातील या पत्रकार परिषदेतील आपला मोर्चा थेट शिवसेना-भाजप महायुतीकडे वळवला. त्यावर मुख्यमंत्री हसत म्हणाले की, ‘मला वाटलंच होतं की तुमचा फायनली इंटरेस्ट तिकडेच जाईल. एवढं मी अभ्यासपूर्ण बोललो. मात्र तुम्ही आपले तिकडेच गेलात’. त्यावर उपस्थित सारेच हसले. मात्र त्यांनतर लगचेच ‘युतीची घोषणा लवकरच होणार’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच समसमान म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देखील लवकरच मिळेल, असेही ते म्हणाले. युतीची काळजी जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे. त्यामुळे योग्यवेळी सर्व फॉर्म्युले जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.





























































