‘नाथसागरा’चे पाणी गोदावरीत सोडले, नदीकाठच्या 400 गावांना सावधानतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसतानाही पैठणचे नाथसागर धरण पुन्हा ओव्हरफ्लो झाले. धरण तुडुंब भरल्याने या धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडून पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले. नाथसागर (जायकवाडी) धरणातून पाणी नदीत सोडल्यामुळे गोदाकाठच्या 400 गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळे नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे जलसंपदा खात्याने नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर- 23098 क्युसेक, नागमठाण- 37760, भंडारदरा- 1423, निळवंडे- 3152, ओझरवेअर- 6301, मुळा- 2000, दारणा- 3216, गंगापूर- 2284, पालखेड-5250 आणि कडवा धरणातून 2047 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढून हेही धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

जायकवाडी धरण तुडुंब भरल्याने जलसंपदा खात्याने या धरणाचे दरवाजे पुन्हा उघडून गोदावरी नदीत पाणी सोडले आहे. जायकवाडी धरणातून 35 हजार 632 क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. धरणातील पाणी नदीत सोडल्यामुळे संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

गोदावरी नदीपात्रात 80 ते एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यास नदीकाठच्या सर्व 400 गावांना मोठा धोका संभावतो. मात्र, सध्या नाथसागरातून केवळ 35 हजार 632 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरीही नदीकाठावर असलेल्या 100 गावांत खबरदारीची उपाययोजना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.