सावधान! अॅसिटीडीच्या ‘या’ औषधापासून होऊ शकतो कॅन्सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही अॅसिटीडीच्या त्रासाने त्रस्त असाल आणि आराम मिळावा म्हणून रेनिटिडाइन (Ranitidine) हे औषध घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही जे औषध आरामासाठी घेत आहात त्यामुळे तुम्हाला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. असा इशारा औषध नियंत्रक मंडळाने दिला आहे. जीएसकेच्या या गोळ्या हिंदुस्थानमध्ये झेन्टेक Zinetac नावाने विकल्या जात आहेत. औषध नियंत्रक मंडळाने इशारा दिल्यानंतर कंपनीने औषध विक्रेत्यांकडून या गोळ्या परत मागवल्या आहेत.

‘दै. भास्कर‘ने दिलेल्या वृत्तानुसार, रेनिटिडाइनमध्ये आरोग्यास अपायकारक रसायन असल्याचे चाचणीत समोर आले आहे. ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा औषध नियंत्रक मंडळाने कंपनीला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. तसेच या औषधांची चाचणी करण्याचेही निर्देश औषध नियंत्रक मंडळाने कंपनीला दिले आहेत. तसेच रुग्नांणा हे औषध देऊ नये किंवा ते घेण्याचा सल्लाही देऊ नये असे स्पष्ट निर्देश औषध नियंत्रक मंडळाने डॉक्टरांना दिले आहेत.

‘या’ औषधांमध्येही होतो रेनिटीडाईनचा वापर

रेनिटीडाईनचा वापर हा अॅसिडीटी घालवण्यासाठी होतो. त्याचबरोबर अल्सर, गेस्ट्रॉइसोफेगल रिफ्लक्स रुग्णांना दिली जाणारी औषध, इसोफैगिटीस मध्येही या औषधाचा वापर होतो. हे औषध बाजारात गोळ्या आणि इंजेक्शनच्या वेगवेगळ्या स्वरुपात मिळते.

दरम्यान, जीएसकेच्या प्रवक्त्याने हिंदुस्थानसह इतर देशातही Ranitdine चे वाटप बंद केल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर Saraca प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या Zinetac चे उत्पादनही रोखण्यात आल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या एफडीएने सर्वप्रथम या औषधांमध्ये कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले रसायन असल्याचा इशारा दिला होता.