
बुधवारी रात्री पुण्यात अक्षरशः आभाळच फाटले. मंगळवारपासून पिरपिरणाऱया पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला आणि 19 पुणेकरांचा बळी घेतला. अवघ्या शहराला बुडवणाऱया या पावसाने हजारो जनावरे मृत्युमुखी पडली, दीड हजारांवर वाहनांचे नुकसान झाले, पूल वाहून गेले. अग्निशमन दलाने 574 जणांना आणि एनडीआरएफच्या पथकाने 10 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असले तरी नऊ जण अद्यापि बेपत्ताच आहेत.
या मुसळधार पावसाने एका रात्रीत महापालिकेला उघडे पाडले असून कात्रज, बिबवेवाडी, वारजेत पुराचा हाहाकार माजला होता. तर आंबिल ओढा कोपल्याने अवघे पुणे पाण्यात बुडाले होते. बारामतीतही कऱहा नदीला पूर आला, तर जळगावमध्ये वीज कोसळून पाचजण ठार झाले. पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः थैमानच घातले. पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुणे शहर आणि परिसरात मंगळपासूनच पावसाची पिरपिर सुरू होती. परतीच्या पावसाची ही भुरभुर असावी असा अंदाज बांधून पुणेकरांची ये-जा सुरू होती. बुधवारी रात्रीपासून मात्र पावसाने जोर पकडला आणि पुणेकरांच्या काळजात धस्स झाले. पावसाचा हा तडाखा विनाशकारीच होता.
अरण्येश्वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिक गंगातीर्थ सोसायटीजवळ थांबले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीची भिंत कोसळून सहाजण ठार झाले, तर खेड शिवापूर दर्गा परिसरात झोपलेले पाच जण पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पावसाच्या रुद्रावतारामुळे कात्रज, कोंढवा, वानवडी, इंद्रायणीनगर, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, आंबिल ओढा कॉलनी, कोथरूड, पद्मावती, मित्रमंत्रळ कॉलनी, आंबेगाव बुद्रुक परिसर, धायरी फाटा, सातारा रस्ता, वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत.
पुण्यामध्ये चौदा वर्षांतील सर्वाधिक पाऊस,मंगळवारीही पावसाची धुवाँधार हजेरी
कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीजवळील पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर रायकरमळा, प्रयेजासिटी परिसरातील पूल वाहून गेले आहेत. शहरभरातील रस्त्यांवर पाणी वाहिल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सातारा रस्ता, पद्मावती, धायरी परिसरात वाहतूक संथगतीने सुरू असून चिखल, दगडगोटे, तसेच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली आहे.
बेपत्ता झालेल्यांची नावे
- निकिता संजय भुट्टे
- मुकेश हरिदास गाडीवर
- संजय किसनराव दहिवाल
- निखिल दिनेश चव्हाण
- सूरज संदीप वाडकर
- गणेश तुकाराम शिंदे
दहा महिन्यांच्या चिमुरडय़ाचे वाचले प्राण
पावसाच्या थैमानामुळे काल रात्री अकराच्या सुमारास मित्रमंडळ चौकातील एका इमारतीत मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले होते. तळघरात एक कुटुंब पाण्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरून जाणाऱया एका अग्निशमन दलाच्या गाडीला थांबवून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवानांनी इमारतीच्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता पाचजणांचे कुटुंब पाण्यात अडकले होते. घरात पाच ते सहा फूट पाणी शिरल्यामुळे आजी-आजोबा घाबरलेल्या अवस्थेत स्टुलावर उभे होते. अग्निशमन दलाने त्यांना आधार देऊन दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर जोडपे आणि त्यांचे 10 महिन्यांचे बाळही घरामध्ये होते. अशा परिस्थितीत एक टब आणून बाळाला त्यामध्ये बसविले. मात्र, चिमुरडा ओरडत असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने टब हेलकावे खात अपघाताची शक्यता हाती. मात्र, मारुती देवकुळे, कैलास आकाडे, अनिल कांबळे या जवानांनी चिमुरडय़ाला टबमध्ये बसवून दोरीने बांधून बाहेर काढताच नागरिकांनी टाळय़ा वाजवून जवानांचे स्वागत केले.

खेडशिवापूरमध्ये ओढय़ात चौघांचे मृतदेह सापडले
हवेली तालुक्यातील खेडशिवापूर दर्गा येथे बुधवारी (दि. 25) रात्री ढगफुटीसदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने ओढय़ाला आलेल्या पुरात अनेकजण वाहून गेले असून त्यातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. पुरात कितीजण वाहून गेले याबाबत नेमका आकडा समजू शकला नसून रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.
10 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
शहरात पावसामुळे उद्भकलेल्या पूरसदृश परिस्थितीनंतर अग्निशमन दलाबरोबर एनडीआरएफच्या पाच तुकडय़ांना पाचारण करण्यात आले आहे. पुणे शहर आणि कात्रजसह बारामतीमध्ये टीम तैनात करण्यात आली आहे. आज सकाळपर्यंत एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जकानांनी तब्बल 10 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पावसाने उसंत दिल्यानंतर मदतकार्याला केग आला होता.
जिल्हय़ासह शहरात ठार झालेल्यांची नावे
रोहित भरत आमले (13), संतोष सहदेव कदम ( 55), श्रीमती सौदलीकर ( 32), सौदलीकर यांचा मुलगा (9), लक्ष्मीबाई पवार ( 70), जोत्स्ना राणे (30), गजराबाई सुदाम खोमणे ( 70), छकुली अनंता खोमणे (22), सुमन आजिनाथ शिंदे ( 65), गौरी शाम सूर्यवंशी, आरती शाम सूर्यवंशी, शाम रामलाल सूर्यवंशी, मच्छिंद्र पांडुरंग बनवले, किशोर दत्तात्रय गिरमे.
- पुण्यातील वेगवेगळय़ा भागांत एक हजारहून अधिक जनावरे दगावली आहेत.
- एकटय़ा सहकार नगरातील श्री दुग्धालय डेअरीतील शंभर जनावरे मरण पावली.
- पाण्याच्या वेगात कात्रज परिसरात दोनशेहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत.
- 150 घरे कोसळली असून सुमारे 100 कुटुंबे बेघर झाली आहेत.
पुण्याचा बाहुबली
शहरातील दांडेकर पुलानजीक आंबिल पुलावरून वाहणाऱया तीन ते चार फूट पाण्याचा प्रवाह धैर्याने पार करीत अग्निशमन दलाच्या राजेश जगताप या जवानाने दोरीच्या मदतीने 30 ते 35 नागरिकांची सुटका करून पुण्याचा बाहुबली असल्याचे दाखवून दिले.
बारामतीच्या कऱ्हा नदीला 11 वर्षांनी पूर
तब्बल 11 वर्षानंतर बारामतीत कऱ्हा नदीला मोठा पूर आला. शहरात नदीकाठची घरे, दुकाने, स्मशानभूमी पाण्याखाली गेली. 224 कुटुंबांसह 602 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले.
जळगावात वीज कोसळून पाच ठार
जळगाव जिह्यात वीज पडून पाचजण मृत्युमुखी पडले. त्यापैकी चारजण एकाच कुटुंबातील आहेत. शेतात असताना त्यांनी झोपडीत आसरा घेतला. त्याचवेळी झोपडीवर वीज कोसळली.
नाशिक, इगतपुरीत मुसळधार
परतीच्या पावसाने नाशिक जिह्याला झोडपून काढले असून बुधवारी पुरात वाहून गेल्याने पाचजणांचा, तर वीज अंगावर कोसळून आज दुपारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


























































