
परतीच्या पावसाने नाशिक जिह्याला झोडपून काढले असून बुधवारी पुरात वाहून गेल्याने पाचजणांचा, तर वीज अंगावर कोसळून आज दुपारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिह्याच्या अनेक तालुक्यांना बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला होता. मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील विशाल भावडू सोनवणे (10) व दर्शन विजय देवरे (11) हे विद्यार्थी मोसम नदीत वाहून गेले. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह सापडले.
नाशिकजवळील मातोरी येथे काल सातवर्षीय सविता युवराज लहारे ही मुलगी पुरात वाहून गेली, तिचा मृतदेह पुढे ओढ्यात आढळला आहे. तिसरी घटना पेठ तालुक्यातील कुठवंडी येथे घडली. रेश्मा तुकाराम भोये (40) या रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. सटाणा तालुक्यातील दहिंदुले येथील देवकाबाई राजाराम पवार (35) या बुधवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आज दुपारी निकवेल येथे आरम नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडला आहे.
मालेगावच्या घानेगाव येथे गुरुवारी दुपारी 3.30 वाजता वीज अंगावर पडून शांताराम तोताराम कुदाळे यांचा मृत्यू झाला. येथे वीज कोसळल्याने म्हैसही मृत्युमुखी पडली आहे. मालेगाव, दिंडोरीत 30 घरांची पडझड मुसळधार पावसामुळे मालेगाव तालुक्यातील जळकू व मानकी येथे 20 घरांची मोठी पडझड झाली, तर दिंडोरी तालुक्यातील खेडगाव व परिसरात 10 घरांचे नुकसान झाले आहे.



























































