
सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या राजेंद्र लोढा समितीच्या शिफारसीनुसार नवी घटना तयार करून निवडणूक घेण्यात यावी, असा आदेश देण्यात आल्यानंतरही टाळाटाळ करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) अखेर येत्या चार ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या निवडणुकीतील मतदानाचा हक्क, त्यांच्याकडून मिळणारे आर्थिक सहाय्य गमावण्याची भीती आणि एमसीएचे सर्व कारभार प्रशासकाच्या ताब्यात जाण्याचे संकट याच पार्श्वभूमीवर एमसीएकडून झटपट निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही निवडणूक प्रक्रिया 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या आठ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. बीसीसीआयने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 4 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत वेळ दिल्यामुळे एमसीएच्या निवडणुकीचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची मते निर्णायक ठरणार
एमसीएच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंबईच्या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना मतदान करता येणार आहे. ही मंडळी 75 ते 80च्या आसपास आहेत. त्यांची मते निर्णायक ठरणार असल्याचे सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले.
- लोढा समितीच्या शिफारसीनुसार सलग दोन वेळा पदावर राहणाऱया व्यक्तीला तीन वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरीयडचा सामना करावा लागणार आहे. त्याला तिसऱयांदा निवडणुकीत उभे राहता येणार नाही. या नियमामुळे एमसीएवर गेली अनेक वर्षे सत्तेत असणाऱया व्यक्तींना यंदाच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. अर्थातच यंदा नवे चेहरे दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
अशी असेल प्रकिया
27 ते 30 सप्टेंबर
क्लब प्रतिनिधींची नावे पाठवावीत
30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर
उमेदवारांनी अर्ज भरावा
2 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
3 ऑक्टोबर
उमेदवारांची अंतिम यादी
4 ऑक्टोबर
निवडणूक आणि निकाल




























































