
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पावसाने हाहाःकार माजवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे दोन दिवसात 79 जणांचा मृत्यू झाला असून बिहारमध्ये 14 जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
यात सुपौल, अररिया, किशनगंज, बांका, समस्तीपुर, मधेपुरा, सहरसा, पूर्णिया, दरभंगा, भागलपुर, खगडिया, कटीहार, वैशाली आणि मुंगेर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच इतर 9 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासात 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या 48 तासात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
रुग्णालय, शाळेच्या इमारतींमध्ये पाणी
पुराचे पाणी शाळेच्या इमारती, रुग्णालयांमध्ये शिरल्याने शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहे. संततधार पावसामुळे बिहारमध्ये रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीजवळील परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसात प्रलंयकारी पावसाने 79 लोकांचा बळी घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्येही पावसाचा धूमाकुळ सुरुच आहे.






















































