
देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना रोज एक तास व्यायामाला द्यावा लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेच (यूजीसी) तसे निर्देश दिले आहेत. व्यायाम, योगा, ध्यानधारणा, चालणे, सायकलिंग, कवायत, नृत्य, पारंपरिक स्वसंरक्षण कला अशा कोणत्याही माध्यमातून हा व्यायाम घेतला जावा असे यूजीसीने म्हटले आहे. प्रत्येकाने रोज किमान दहा हजार पावले चालण्याचा व्यायाम केला पाहिजे, असेही सांगितले आहे.
यूजीसीने या नियमित व्यायामाबद्दल एक नियमावली बनवून आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. सर्व उच्च शिक्षण संस्थांनी आपले विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक फिटनेसकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्याचीही व्यवस्था प्रत्येक संस्थेने करावी असे यूजीसीचे निर्देश आहेत.
अशी आहे नियमावली…
- व्यायामासाठी रोज एक तास कोणता ठेवावा याचे वेळापत्रक प्रत्येक संस्थेने बनवावे.
- विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवण्यास आणि मार्गदर्शन करण्यास फिटनेस लीडर नेमावेत.
- संस्थेतील उच्चाधिकारी आणि प्राध्यापकांनीही व्यायामात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.
- किमान दर तीन महिन्यांनी क्रीडा स्पर्धा भरवा. त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या.
- मानसिक आरोग्यासाठी तणावमुक्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करा.
- विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जिने चढण्यासाठी, संस्थेच्या आवारात सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन द्या. विशेषतŠ जिने चढून जाण्यास सांगा. जिमची व्यवस्था करा.
- दरवर्षी आरोग्य तपासणी शिबीर घ्या.
- फिटनेस कार्यक्रमाची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड करा.



























































