‘मंगळ’ आणि ‘गुरू’मध्ये ‘पंडित जसराज’ लघुग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या लोकप्रियतेने आता खर्‍या अर्थाने अवकाशाला गवसणी घातली आहे. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांमधील लघुग्रहाला ‘पंडित जसराज’ असे नाव देण्यात आले आहे. अशाप्रकारचा सन्मान होणारे ते पहिले हिंदुस्थानी कलाकार आहेत.

इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल युनियनने (आयएयू) ‘मायनर प्लेनेट 2006 व्हीपी 32’(क्रमांक – 300128) या लघुग्रहाचे नामकरण पंडित जसराज यांच्या नावाने केले आहे. या ग्रहाचा शोध 11 नोव्हेंबर 2006 रोजी लागला होता. आपल्या वडिलांचे नाव एखाद्या लघुग्रहाला देण्यात आल्याबद्दल पंडित जसराज यांच्या कन्या दुर्गा यांनी आनंद व्यक्त केला. ‘आयएयू’च्या अधिकार्‍यांनी 23 सप्टेंबरला लघुग्रहाच्या नामकरणाबाबत अधिकृत घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले. संगीत मार्तंड पंडित जसराज हे हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीतातील दिग्गज आहेत. संगीत क्षेत्रासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. त्यांचा याआधी प्रतिष्ठsच्या विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. एखाद्या लघुग्रहाला हिंदुस्थानातील कलाकाराचे नाव मिळण्याचा ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मोझार्ट बीथोवन आणि टेनर लुसियानो पावारोत्ती यांचा सन्मान झाला आहे.

लघुग्रहाचा नंबर जन्मतारखेवरून

‘आयएयू’च्या लघुग्रह केंद्राकडून ‘पंडित जसराज’ लघुग्रहाला 300128 हा कायमस्वरूपी नंबर देण्यात आला आहे. पंडित जसराज यांची जन्मतारीख 28 जानेवारी 1930 आहे. या तारखेच्या (28/01/30) उलटक्रमावरून’ पंडित जसराज’ लघुग्रहाला नंबर दिला गेला आहे.

माझ्यावर ईश्वराची निस्सीम कृपा असल्याचे दिसते. हा लघुग्रह सूर्याची प्रदक्षिणा करतो आहे. हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी संगीतासाठी हा ईश्वराचाच आशीर्वाद आहे. – पंडित जसराज