
मतदान आपला हक्क आहे, तो आपण बजावला पाहिजे व सशक्त लोकशाही घडवण्यासाठी आपण या राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले पाहिजे, याबाबत जनजागृती करण्यासाठी आदिवासी वाडीतील विद्यर्थ्यांनी रॅली काढली. रोहा तालुक्यातील पेण विधानसभा मतदार संघातील चिंचवलीतर्फे आतोणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी चिंचवलीतर्फे आतोणे आदिवासीवाडीत मतदान जनजागृती फेरी काढली. ग्रामस्थ, युवक, वृद्ध यांना मतदानाचे महत्व पटवून दिले. सशक्त लोकशाही घडवण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आहवान विद्यार्थ्यांनी केले.
राज्य विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ही जनजागृती करण्यात आली. वाडीतील उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. या जनजागृतीला सर्व ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सर्वांनी मतदानाचा अधिकार बाजावण्याचा संकल्प केला. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पेण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुद्दलवाड, रोहा तहसीलदार कविता जाधव, रोहा गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, रोहा गट शिक्षण अधिकारी साधुराम बांगारे, येरळ केंद्रप्रमुख प्रमोद चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिंचवली तर्फे आतोणे ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक राजेश देसाई, शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव, उपशिक्षक जगन्नाथ अब्दागिरे, अंगणवाडी सेविका कल्पना बुरुमकर, रोशनी मुसळे, आशा सेविका स्मिता धनावडे, ग्रामपंचायत कर्मचारी जगन्नाथ जाधव व गावातील, आदिवासीवाडीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.































































