नांदेड – नरसी परिसरात ढगफुटीसदृश्य स्थिती, घरांमध्ये पाणी शिरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nanded-narasi-flood

ढगांच्या गडगडाटासह धो-धो कोसळलेल्या तुफानी पावसाने गुरुवारी रात्री नांदेडमधील नरसी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शहरातील बाजारपेठेसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. मुखेड रोडवरील पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे रस्ता कधीही खचण्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे तब्बल 10 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. या रौद्ररुपी जलधारांनी शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री आठ ते साडे नऊ दरम्यान नरसी परिसरात 91 मिमी, तर नायगाव तालुक्यात 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. यंदाच्या मोसमात वादळी पावसाची ही परिस्थिती नांदेडमध्ये प्रथमच पाहायला मिळाली. काही तास सतत वेगाने कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने येथील चौकाला तळ्याचे स्वरुप आले होते. महामार्गाची वाहतूकही काही काळ ठप्प होती. बाजारपेठेतील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले.

मेहबुबनगर, दत्तनगर, संभाजीनगर, शामनगर, बालाजीनगर आदी परिसरात गुडघ्या एवढे पाणी जमा झाले होते. अनेक घरांमध्ये देखील पाणी जमा झाले. पाण्याच्या वेगाने मुखेड रोडवर असलेल्या पुलाच्या खालील भाग वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. यामुळे सदरील रस्ता कधीही खचून दुर्घटना घडण्याची भीती असून तेथे तात्काळ भराव घालण्याची गरज आहे.

गेल्या पंचवीस वर्षात तरी नरसी चौकात कधी एवढे पाणी आले नव्हते अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कडाडणाऱ्या विजा आणि मुसळधार पाऊस यामुळे अक्षरशः ढगफुढी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.

प्रशासनाने शेती शिवारांचे तत्काळ पंचनामे करावे

या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले असून काढणीस आलेल्या सोयाबीन सोयाबीन व शेतातील कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. नरसीसह नायगांव येथे देखील अनेक घरात पावसाचे पाणी तुंबले असून परतीच्या या पावसाने दिलेल्या जबरी तडाख्याने प्रचंड फटका बसलेल्या शेती शिवारांचे प्रशासनाने तात्काळ पहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.