मराठमोळ्या सौरभ अम्बुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजया दशमीच्या मुहूर्तावर हिंदुस्थानी हवाई दलात राफेल दाखल झालं. राफेल दाखल झाल्यानंतर हवाई दलाची ताकद अजूनच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी हवाई दलाच्या स्क्वॉड्रन लीडर सौरभ अम्बुरे या मराठमोळ्या वीराला राफेल उडवण्याचा पहिला मान मिळाल्याचं वृत्त आहे. शत्रुला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये बसून अम्बुरे यांनी जुलै 2019मध्येच आकाशात झेप घेतली आहे.

हिंदुस्थान आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये जुलै 2019मध्ये गरुड युद्धाभ्यास सुरू होता. या संयुक्त युद्घाभ्यासात राफेल, मिराज-2000, सुखोई-30 अशी लढाऊ विमानं समाविष्ट झाली होती. दोन्ही देशांमधील आशिया-पॅसिफिक करारानुसार जवळपास चौदा दिवस हा सराव चालला. त्यात राफेलही सामील झालं होतं. या युद्धाभ्यासाच्या निमित्ताने हवाई दलाच्या वैमानिकांना राफेलविषयी अधिक माहिती मिळावी असा हेतू होता.

या युद्धाभ्यासात हिंदुस्थानच्या हवाई दलाचे 120 वैमानिक सामील झाले होते. यावेळी राफेल उडवण्याचा पहिला मान हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर म्हणून कार्यरत असलेल्या सौरभ अम्बुरे यांना मिळाला होता.