
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एक विलक्षण मासा आकर्षणाचं केंद्र बनला आहे. कारण या माशाच्या अंगावर अल्ला असं लिहिलं आहे. त्यामुळे या माशाला बघायला झुंबड उडाली असून त्याला खरेदी करण्यासाठी पाच लाखांची बोली लागली आहे.
शामली जिल्ह्यातील कैराना येथे राहणारे शबाब अहमद हे पाळीव माशांचा व्यवसाय करतात. त्यांच्या छोटेखानी मत्स्यालयात आठ महिन्यांपूर्वी एक मासा ते घेऊन आले. तो मासा जसजसा मोठा होऊ लागला, तसं त्याच्या काळ्या रंगाच्या त्वचेवर लालसर सोनेरी रंगात उर्दू भाषेत अल्ला या नावाची नक्षी आहे, असं दिसून आलं. त्यामुळे त्याला पाहायला मोठी गर्दी होऊ लागली आहे. शबाब यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा मासा घरी आला, तेव्हापासून त्यांची भरभराट होऊ लागली.
त्यांच्याकडच्या या अनोख्या माशाबद्दल लोकांना समजल्यानंतर कित्येक जण अहमद यांच्याकडे येऊन त्याची चौकशी करू लागले. तिथल्या हाजी राशिद खान नावाच्या स्थानिक माणसाने पाच लाख रुपयांची बोली या माशावर लावली आहे. पण, अहमद यांना मात्र अजून जास्त किमतीच्या बोलीची प्रतीक्षा आहे. अहमद यांच्या म्हणण्यानुसार, अल्ला असं लिहिलेला हा मासा म्हणजे एक नैसर्गिक चमत्कार आहे. आणि त्यांना अजून चांगली बोली मिळाल्याशिवाय ते हा मासा विकणार नाहीत.

























































