
धो धो कोसळणारा पाऊस, कडाडणाऱ्या विजा आणि सुसाट वारा अशा वातावरणात परळी विधानसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी काल अंबाजोगाई तालुक्यातील मतदारांशी थेट संवाद साधला. भर पावसात झालेल्या स्वागताने भारावलेल्या पंकजा यांनी त्यांच्यावर धरलेली छत्री बाजूला सारून “अशा वादळ वाऱ्याला घाबरणारी नाही. माझ्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे रक्त आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीन” असे उद्गार काढले.
धुवाँधार पाऊस सुरू असतानाही गुरूवारी रात्री पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव, भारज आणि लिंबगाव या गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधला. यावेळी भर पावसात महिला मोठ्या संख्येने ताईंच्या स्वागतासाठी थांबल्या होत्या. ‘मी तुमच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून काम करायचे आहे. कधी नव्हे एवढा विकास मी मंत्री झाल्यापासून केला आहे. गावोगावी आणि गल्लोगल्ली चांगले रस्ते झाले आहेत. विकासात दळणवळणाला महत्त्व असते आणि त्यासाठी रस्ते चांगले असावे लागतात. आपल्या भागातील सर्वच रस्ते चांगले केले आहेत. विकासासाठी जे आवश्यक आहे ते सर्व मी केले आहे. विकासाची गंगा अगदी गोरगरीबांच्या दारापर्यंत आणली आहे’ असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी काळात युवकांच्या हाताला काम देणारे उद्योग या भागात आणायचे असुन शेत मालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे देखील त्यांनी आश्वासन दिले.
































































