
परभणी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवीराज देशमुख यांच्याविरुद्ध शुक्रवारी आचारसंहिता भंग केल्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. तसेच तातडीने योग्य तो खुलासा करावा अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार निवडणुक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी देशमुख यांना दिला आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस आघाडीचे उमेदवार रविराज देशमुख यांनी मोबाईलद्वारे जनतेस अनेक एसएमएस केले असून याद्वारे मतदानासाठी परावर्तीत करण्याचा तथा स्वत:च्या प्रचाराच्या प्रयत्न केला आहे. परंतु मिडीया कक्षाद्वारे एसएमएस करण्याची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. पूर्व परवानगी न घेता एसएमएसद्वारे प्रचार केल्याबाबत आपण तातडीने खुलासा करावा, अथवा आपल्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच नोटीस मिळताच स्वत: किंवा प्रतिनिधी पाठवून तातडीने खुलासा करावा, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.


























































