फुले आणि सावरकरांना ‘भारतरत्न’ची शिफारस, भाजपचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

#MahaElection 2019 विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणमैदानात उतरलेल्या विविध पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. मंगळवारी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुढील पाच वर्षांत राज्यातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून मांडला आहे.

या प्रकाशन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यातील मुख्य मुद्द्यांचे वाचन केले. यात 16 महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात, मराठवाड्यासह राज्यातील अन्य दुष्काळी भागात त्यांना त्यांच्या हिश्श्याचं पाणी देणार. पुरातून वाहून जाणारं पाणी जे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांचे नाही ते कॅनलद्वारे दुष्काळी भागात पोहचवू अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवू मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबवू, असे सांगतानाच ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीसाठी रोड मॅप तयार करून त्यादिशेने वाटचाल करणार असेही त्यांनी सांगितले.

या विकासकामांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव व्हावा, यासाठी शिफारस करणार असल्याचंही या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.