धरिला पंढरीचा चोर… विठुरायाची नोट ढापताना सेवेकरी सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भक्तांने देवाच्या पायावर ठेवलेली 2000 ची नोट मोठ्या शिताफीने ढापताना विठुरायाच्या शेजारी उभा असलेला सेवेकरी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अमोल चिटणीस असे या चोरट्याचे नाव असून तो मंदिर समितीचा कर्मचारी आहे. चोरी निदर्शनास आल्याने समितीने त्याच्या विरुद्ध फिर्यादी दिली असून पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

देवाचे परंपरागत सेवेकरी बडवे यांचे हक्क न्यायालयाने रद्दबादल केल्यानंतर देवाची पूजाअर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने खाजगी सेवेकऱ्यांची नियुक्ती केली आहे. बडव्यांची जागा घेतलेले हे शासकीय बडवे वारकरी भाविकांशी सौजन्याने आणि प्रामाणिकपणे काम करतील असे अपेक्षित होते मात्र परंपरागत बडव्यांपेक्षा सरकारी बडवे भाविकांवर अधिक अत्याचार आणि चोऱ्या करीत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.

आता तर चक्क भाविकाने श्री विठ्ठलाच्या पायावर वाहिलेली 2000 ची नोट देणगी पेटीत अर्धवट अवस्थेत सोडून, सीसीटीव्हीत आपली ही चोरी सापडणार नाही याची दक्षता घेत, या चतूर चोरट्याने पायावरचा तुळशीचा हार काढताना मोठ्या चलाखीने पेटीतील 2000 नोट ढापली. हा प्रकार केंव्हा पासून सुरु आहे, या साखळीत कोणकोण सहभागी आहेत हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

काही महिन्यांपूर्वी मंदिर समितीचा असाच एक कर्मचारी देवाच्या दर्शन रांगेत बसून बोगस पावत्या देऊन भाविकांकडून देणगी गोळा करीत होता. एवढी मोठी घटना निर्दशनास आल्यानंतर हे प्रकरण मंदिर समितीने फारसे गांभीर्याने घेतले नाही. बोगस पावत्या देणाऱ्यावर कठोर कलमे न लावल्याने बोगस देणग्या गोळा करणाऱ्याला दोन दिवसांत जमीन मिळाला होता. या प्रकरणात तरी मंदिर समितीने मुळापर्यत शोध घेणे गरजेचे आहे.