
राज्यात 288 विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील अनेक पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल समोर आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे.
महायुती महाविजयाकडे! काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ होणार, एक्झिट पोलचा अंदाज
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी निवडणूक प्रचारावरून काँग्रेसच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. यानंतर आता काँग्रेसनेही राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ‘राष्ट्रवादी सोबत असताना आम्हाला शत्रूची गरज नाही. शरद पवार यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचा कोणता नेता राज्यभर फिरला? अखेर प्रकृती चांगली नसतानाही 80 वर्षांच्या शरद पवारांना राज्यभर फिरून सभा घ्याव्या लागल्या,’ असे म्हणत काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत ‘न्यूज 18 हिंदी‘ने वृत्त दिले आहे.
दरम्यान, एक्झिट पोलनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कलह समोर आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडले आहे. ‘पूर्ण निवडणुकीत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी दिसल्या नाहीत. राहुल गांधी आले पण काँग्रेसचेच नेते त्यांच्या सभांमध्ये दिसले नाहीत. फक्त शरद पवारांनीच एकट्याने मेहनत केली,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी म्हटले आहे. तसेच जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला नाही हे आम्हाला मान्य आहे, काँग्रेसशी आघाडी करणे हा आमचा नाईलाज होता. एकट्याने निवडणूक लढणे शक्य नव्हते,’ असेही माजिद मेमन म्हणाले.


























































