आयआरसीटीसीची ओटीपी नंबर आधारित तिकीट रिफंड योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रेल्वेने तिकिटांच्या परताव्याची पद्धत अधिक पारदर्शी आणि प्रवाशांच्या सोयीची करण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. प्रवाशांकडून रद्द केलेल्या किंवा प्रतीक्षा यादी लांबल्याने प्रवास करता येऊ न शकणाऱया आरक्षित ई-तिकिटांचा रिफंड प्रवाशांना देताना आता रेल्वे प्रवाशांच्या रजिस्टर मोबाईल क्रमाकांवर ‘ओटीपी’ म्हणजेच वन टाइम पासवर्ड पाठविणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱया रिफंड देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

रेल्वेची ई-तिकिटिंग आणि खानपान सेवा सांभाळणाऱया आयआरसीटीसीने नवी प्रणाली आणली आहे. या नव्या प्रक्रियेत आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटमार्फत तिकिटे बुक करणाऱया प्रवाशांना फायदा होणार आहे. अशी तिकिटे काही कारणास्तव प्रवाशांनी रद्द केली किंवा चार्ट तयार होऊनही प्रतीक्षा यादी संपली नाही तर अशा तिकिटांचा रिफंड प्रवाशांना मिळण्यापूर्वी प्रवाशांनी एजंटद्वारे नोंदविलेल्या त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर प्रवाशांना ओटीपीसह रिफंडची रक्कम एसएमएसने पाठविली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा ओटीपी क्रमांक एजंटला द्यावा लागणार असून प्रवाशांनाही त्यांना मिळणाऱया रिफंडची रक्कम कळणार आहे.

रिफंडची नेमकी रक्कम कळणार
या नव्या ओटीपी आधारित रिफंड पद्धतीने या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द करण्याच्या बदल्यात रेल्वेकडून एजंटद्वारे मिळणारी रिफंडची नेमकी रक्कम कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तिकीट रद्द करून रिफंड मिळण्याची प्रक्रिया सुरळीत होऊन प्रवाशांना मिळालेली रिफंडची रक्कम एजंटकडून वेळेत मिळण्यास मदत होईल अशी माहिती आयआरसीटीसीच्या सूत्रांनी दिली.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी
रेल्वेच्या ई-तिकिटांचे आरक्षण करताना आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटना प्रवाशांनी योग्य मोबाईल क्रमांक द्यावा.
ई-तिकिटांचे आरक्षण करताना एजंटने योग्य मोबाईल क्रमांक नोंद केला आहे का याची प्रवाशाने खातरजमा करावी.
आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाच प्रवाशांच्या ई-तिकिटांच्या बुकिंगचे अधिकार दिले आहेत.