
विराट कोहलीसह अनेक प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत खेळणाऱया ‘टीम इंडिया’ला पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात बांगलादेशने 7 गडी आणि 3 चेंडू राखून हरवले. मुश्फिकर रहीमने खलील अहमदच्या 19व्या षटकात सलग चार चौकार ठोकून हिंदुस्थानच्या खिशातून सामना खेचून आणला. शेवटी महमुदुल्लाहने षटकार ठोकून बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीतील धुक्यात बहुतांश नवख्या खेळाडूंच्या यजमान संघाला आज विजयाची आपली मालिका कायम राखता आली नाही.
हिंदुस्थानकडून मिळालेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशने 19.3 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती. युझवेंद्र चहलने पाचव्याच चेंडूवर लिटन दासला (7) लोकेश राहुलकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मोहम्मद नईम (26) व सौम्या सरकार (39) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली, मात्र तरीही 18 व्या षटकापर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता.
रोहित शर्मा अपयशी
त्या आधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 6 बाद 148 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. कर्णधार रोहित शर्माने शफिउल इस्लामच्या पहिल्याच षटकात 2 चौकार ठोकून खणखणीत सुरुवात केली होती, मात्र अखेरच्या चेंडूवर तो पायचित झाल्याने हिंदुस्थानला पहिल्याच षटकात जबर झटका बसला. त्याच्या जागेवर आलेल्या लोकेश राहुललाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 17 चेंडूंत 2 चौकारांसह 15 धावा केल्या. राहुलला अमिनुल इस्लामने महमुदुल्लाहकरवी झेलबाद करून बांगलादेशला दुसरे यश मिळवून दिले. आलेल्या श्रेयस अय्यरने 13 चेंडूंत 2 षटकार व एका चौकारासह 22 धावांची संक्षिप्त पण देखणी खेळी केली. एका बाजूने किल्ला लढविणारा दुसरा आघाडीवर शिखर धवन दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. त्याने 42 चेंडूंत 41 धावा करताना 3 चौकारांसह एक षटकार ठोकला.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही 26 चेंडूंत 3 चौकारांसह 27 धावांची उपयुक्त खेळी केली, मात्र पदार्पणवीर शिवम् दुबे अवघ्या एका धावेवर बाद झाला. चार चेंडूंचा सामना करणाऱया या मराठमोळ्या फलंदाजाने अफिफ होसैनच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच झेल दिला. शफिउल इस्लामने पंतला मोहम्मद नईमकरवी झेलबाद केल्यानंतर कृणाल पांडय़ा (नाबाद 15) व वाशिंग्टन सुंदर (नाबाद 14) यांनी अखेरच्या दोन षटकांत हाणामारी केल्याने हिंदुस्थानला 148 धावसंख्येपर्यंत पोहचता आले. बांगलादेशकडून शफिउल इस्लाम व अमिनुल इस्लाम यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर अफिफ होसैनने एक बळी टिपला.
19 व्या षटकात सामना फिरला होता
खलील अहमदने 17 व्या षटकात सौम्या सरकारचा त्रिफळा उडवून सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला होता, मात्र युझवेंद्र चहलच्या पुढच्या षटकात दोन चौकार गेल्याने बांगलादेशवरील दडपण थोडे कमी झाले. खलील पुन्हा 19व्या षटकात गोलंदाजीला आला, मात्र व्हायचे तेच झाले. नजर बसलेल्या मुश्फिकरने खलीलचे अखेरचे चार चेंडू सीमापार धाडून बांगलादेशला विजयाच्या दारात आणून ठेवले. अखेरच्या षटकांत 4 धावांची गरज असताना कर्णधार रोहित शर्माने पदार्पणवीर शिवम् दुबेला मोर्चावर आणले, मात्र महमुदुल्लाहने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला. मुश्फिकरने 43 चेंडूंत एक षटकार व 8 चौकारांसह नाबाद 60 धावांची खेळी सजवली तर कर्णधार महमुदुल्लाहने 7 चेंडूंत नाबाद 15 धावा करताना एक षटकार व एक चौकार लगावला.



























































