
पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने लंडनमधील न्यायालयात पाचव्यांदा जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. यावेळी मोदी याने त्याला तुरुंगात तीन वेळा मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. तसेच मला हिंदुस्थानकडे सोपवल्यास मी आत्महत्या करेन. असेही सांगितले.
नीरव मोदी वेस्टमिन्स्टर न्यायालयात पाचव्यांदा जामीन अर्ज देण्यासाठी वकील हुगो कीथ यांच्यासोबत हजर होता. पंजाब नॅशनल बँकेतील14 हजार कोटी रूपयांच्या संबधी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोदीवर आरोप ठेवण्यात आले आहेत. नीरवला वेंड्सवर्थ तुरुंगात दोनदा मारहाण झाली.तसेच मंगळवारीही दोन कैदी त्याच्याजवळ आले व त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर माझ्याविरोधात कोणीतरी हे कटकारस्थान रचत असल्याचा आरोपही मोदी यांच्या वकीलाने यावेळी केला. आपला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मोदी याचे मेडीकल रिपोर्टही न्यायालयात सादर केले. तसेच या घटनेची कोणीही दखल घेतली नाही. तसेच कोणतीच कारवाईही केली नाही. असे हुगो कीथ यांनी म्हटले आहे. यावेळी मोदी याने मला जर हिंदुस्थानात पाठवण्यात आले तर मी आत्महत्या करेन. अशी धमकीच न्यायालयात दिली. पण या धमकीचा कोणताच परिणाम न्यायालयावर झाला नाही.

























































