कर्तारपूरसाठी 550 हिंदुस्थानी रवाना, नरेंद्र मोदींच्या हस्ते कॉरिडॉरचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या कर्तारपूरमधील दरबार साहिब येथे भेट देण्यासाठी 550 हिंदुस्थानी भाविकांची पहिली तुकडी आज पंजाबमधील गुरुदासपूर येथून रवाना झाली. या कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कर्तारपूरसाठी निघालेल्या भाविकांच्या तुकडीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे.

हिंदुस्थानातील शीख बांधवांच्या कर्तारपूर दौऱ्यासाठी पाकिस्तानसोबत करार करण्यात आला असून शीख भाविकांची पहिली तुकडी कर्तारपूरमधील दरबार साहिब येथे भेट देणार आहे. या कॉरिडॉरचे उद्घाटन आज गुरुदासपूर इथल्या चेकपोस्टजवळून करण्यात आले. कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतानपूर लोधी येथील बेर साहिब गुरुद्वारा येथे भेट दिली तसेच लंगरमध्ये सर्वसामान्यांसह भोजनही केले. कर्तारपूर कॉरिडॉरसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानत शीख भाविकांना शुभेच्छा दिल्या. कर्तारपूर दौऱ्यात माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू, खासदार सनी देओल तसेच पंजाबमधील विविध पक्षाचे आमदार आणि खासदार सहभागी झाले आहेत.