मुद्दा – पाकिस्तानशी मैत्री नकोच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दादासाहेब येंधे

पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर हिंदुस्थान द्वेष्टा आहे हे नव्याने सांगायला नको. हिंदुस्थानच्या सीमेवरील नियंत्रण रेषेचे उल्लंघन त्यांच्यासाठी नवे नाही. सतत सीमेवर त्यांच्या कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करणे म्हणजे महाचूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र हिंदुस्थान प्रत्येक वेळी ती चूक करतो. त्यामुळे यापुढे चर्चा किंवा मैत्रीचे बोलणे नकोच. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तरच त्यांचा आगाऊपणा कमी होईल.

श्रीलंका, चीन, अफगाणिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे पाकिस्तान हाही आपल्या शेजारील देश आहे. मात्र एक सख्खा शेजारी अशी पाकिस्तानची हिंदुस्थानसोबत ओळख नाही. परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणूनच पाकिस्तानचा उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता तशी ओळख होण्यास त्यांची वागणूक कारणीभूत आहे. आपल्या क्रूर आणि वाईट कारवायांमुळे पाकिस्तानने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. जगात कुठल्याही देशाच्या सीमेवर, नियंत्रण रेषेवर तणाव नसेल तितका हिंदुस्थान-पाक सीमेवर नेहमी असतो याचेही कारण पाकिस्तान हाच आहे. हिंदुस्थानने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. हिंदुस्थान हा सोशिक देश आहे. पुरातन काळापासून हिंदुस्थानने कुणावर आपणहून हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. याउलट हिंदुस्थानवर हल्ला झाल्याचा इतिहास सांगतो. हिंदुस्थानने असे आणि अनेक हल्ले पचवले आहेत. कारण आमच्यात सहिष्णुता आहे. आम्ही शांततेचे पाईक आहोत. मात्र हिंदुस्थानात शांतता नांदावी असे पाकिस्तानला कधीच वाटत नाही.

पाकिस्तानला बेचिराख करणे हिंदुस्थानसाठी मोठे आव्हान नाही. मात्र हिंदुस्थानला पाकिस्तानपेक्षा स्वतःच्या प्रतिमेची अधिक काळजी आहे. हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय संबंध जोपासायचे आहेत. पाकिस्तानवर हल्ला करून आशिया खंडातील शांतता भंग करायची नाही. म्हणून हिंदुस्थान प्रत्येक वेळी गप्प राहतो. मात्र याचा चुकीचा अर्थ पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर काढत आहेत. आपले हिंदुस्थानी जवान सीमेवर जे काही करतील त्याचे देशाच्या भूमीवरही समर्थन केले जाईल असा एकत्रित आवाज आणि भावना आपल्याकडे निर्माण झाल्या पाहिजेत. हा देश हिंदुस्थानबरोबर सौजन्याने वागेल याची अजिबात शक्यता उरलेली नाही. मग हिंदुस्थानने सौजन्याने वागण्याचा ठेका घेतलेला नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पाकिस्तानला उघडे पाडले पाहिजे. त्याचा निषेध केला पाहिजे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरीत पाकिस्तान खेळाडूंचे किंवा कलाकारांचे कार्यक्रम बंद पाडले गेले तरच त्याचा सगळ्या जगभर संदेश जाऊ शकतो.

कोणतीच मानमर्यादा न पाळणाऱया पाकिस्तानी नागरिकांचे, खेळाडूंचे आणि कलाकारांचे हिंदुस्थानात लाड करण्याचे काहीच कारण नाही. सीमेवर पाकिस्तानचे जवानांचे प्राण द्यायचे आणि इथे येऊन पाक खेळाडूंनीही खेळाचा आनंद उपभोगायचा हादेखील एक क्रूरपणाच ठरतो. सगळ्या देशातील जनतेच्या भावना समान असल्या पाहिजेत. सीमेवर जवानांचे प्राण जात असतील तर त्याचा निषेध प्रत्येक हिंदुस्थानीने केला पाहिजे. सीमेवरच्या जवानांच्या पाठीमागे सगळ्या जनतेच्या भावना उभ्या राहिल्या पाहिजेत. जवानांनी प्राणांची बाजी लावायची आणि इकडे कोटय़वधीचा लिलाव करून पाकिस्तानी खेळाडूंनी तिजोऱया भरायच्या हा प्रकार अजिबात खपवून घेता कामा नये. पाकिस्तानची खोड मोडायची असेल तर त्या देशाला कायमचा धडा शिकवावा लागेल. पुढची काही वर्षे या देशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवता कामा नयेत. सांस्कृतिक, आर्थिक, व्यवसाय किंवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. कारण त्या देशातल्या राजकारण्यांना आणि लष्कराला सभ्यतेची, सौम्य किंवा मानवतेची भाषा समजत नाही.

सातत्याने जिहाद आणि दहशतवाद एवढा एकच उद्योग तिथे चालतो. यासाठी पुढची काही वर्षे मुंबईत किंवा हिंदुस्थानच्या भूमीवर कुठेही पाक खेळाडूंचा, कलाकारांचा कोणताच कार्यक्रम होता कामा नये. हा एकदा दणका दिला की, तिथल्याच नागरिकांना आपल्या सरकारकडून कशा प्रकारे चुका होत आहेत हे लक्षात येईल आणि त्यातून त्यांचे होणारे नुकसान त्या देशाचेच नुकसान करणारे ठरेल. कदाचित हिंदुस्थानने घातलेला हा बहिष्कार पाकिस्तानला थोडाफार धडा देणारा ठरू शकेल. पाकिस्तानने हिंदुस्थानच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तसेच हिंदुस्थाननेही अति संयम दाखवू नये. ‘शहाण्याला शब्दांचा मार, मूर्खाला लाथेचा मार’ या म्हणीप्रमाणे आगाऊ पाकिस्तानला इशारे आणि समज देण्यात अर्थ नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक वाईट कृतीचे उत्तर त्यांच्याच भाषेत द्यायला हवे.