
कोकण मार्गावर धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एसी डबल डेकर गाडीला कायमस्वरूपी सात अतिरिक्त एसी डब्बे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या डब्यांचे आरक्षण 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने ट्रेन क्र. 11085/11086 एलटीटी-मडगाव एसी डबल डेकरला सात अतिरिक्त एसीचे डबे कायमस्वरूपी तत्त्वावर जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात पाच एसी-3 टीयर आणि दोन एसी-2 टीयरचे डबे 9 जानेवारी 2020 पासून जोडण्याचा निर्णय घेतला आहे तर ट्रेन क्र. 11099/11100 एलटीटी- मडगाव एसी डबलडेकर गाडीला पाच एसी-3 टीयर आणि दोन एसी-2 टीयरचे असे एकूण सात एसीचे डबे 11 जानेवारी 2020 पासून कायमस्वरूपी जोडण्यात येतील असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
एलटीटी- मडगाव एसी डबल डेकरचे जोडलेले अतिरिक्त सात डबे दुमजली नसून एक मजली आहेत. दिवाळीमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीमुळे या गाडीला प्रथम सात अतिरिक्त एसी डबे जोडले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे डबे कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विकेंडला सुटत असते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
दादर किंवा सीएसएमटीतून गाडी सोडा!
या गाडीला एसीचे अतिरिक्त सात डबे जोडल्याने डब्यांची एकूण संख्या 15 होणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनससारख्या गैरसोयीच्या ठिकाणाऐवजी सीएसएमटी किंवा दादर येथून सोडण्याची मागणी प्रवासी बळीराम राणे यांनी केली.




























































