
मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानाला धरून नव्हती असा आरोप करत सभात्याग करणाऱया भाजपच्या सदस्यांचा आज सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सदस्यांनी चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याने भाजपच्या पोटात का दुखले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी केला तर राष्ट्रपुरुषांची नावे घेतली तर कारवाई होणार असेल तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील ठराव मंजूर झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करणारी भाषणे केली. यावेळी जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, प्रहार क्रांती संघटनेचे बच्चू कडू व मंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली.
उद्धव ठाकरे हरिश्चंद्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळाले आहे अशा शब्दांत प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कौतुक केले.
उद्धव ठाकरेंमुळे सरकार टिकले
मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होतो. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे सरकार पाच वर्षे सत्तेत राहिले याची आठवण त्यांनी ठेवायला हवी होती. या अधिवेशनाची सूचना मध्यरात्री सदस्यांना देण्यात आली अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, तुम्ही रात्रीच्या अंधारात शपथविधी केला, पण आम्ही दिवसा शिवतीर्थावर शिवरायांच्या साक्षीने शपथविधी केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करीत शपथ घेतली. त्यामुळे काही कारवाई होणार असेल तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत यांचा 170 चा आकडा खरा
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलेला 170चा आकडा बरोबर होता. संजय राऊत यांनी सांगितलेला आकडा खरा होता. आज अध्यक्षस्थानी दिलीप वळसे-पाटील आहेत, तर 169 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे याकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले.
विरोधी पक्षनेता आरशात दिसेल
विरोधी पक्षाने खरे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे होते, मात्र त्यांनी भाषणे केली व ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी प्रचारात मला विरोधी पक्षच दिसत नाही असे म्हटले होते. तेव्हा मी त्यांना तुम्ही आरशापुढे उभे रहा म्हणजे विरोधी पक्षनेता दिसेल असे म्हणालो होतो ते आज खरे ठरले, असा टोला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
महापुरुषांबद्दल भाजपाला असूया
आयुष्यात जेव्हा अत्युच्च आनंदाचा क्षण असतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात ज्यांचे अतिशय महत्त्व असते किंवा महापुरुष यांची नावे घेतो. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले या महापुरुषांची नावे जर आम्ही शपथविधीच्या वेळी घेतली तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला इतकी असूया का वाटली, असा सवाल मंत्री जयंत पाटील यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार घोडेबाजार होऊ न देता विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करून घेतल्याबद्दल हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे त्यांनी आभारही मानले. विधानसभेतील विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा अशी आमची अपेक्षा आहे. आता भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
…तर संसदच बरखास्त करावी लागेल!
आम्ही आमच्या दैवतांची नावे घेतली. त्यानंतर राज्यपालांनी दिलेली शपथ जशीच्या तशी वाचली त्यामुळे भाजपच्या आरोपात तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. जनतेने मजबूत विरोधी पक्ष दिला आहे, मात्र त्यांनी विरोध न करता सभागृहाच्या बाहेर गेल्याचे ते म्हणाले. शपथ घेण्याच्या आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतले हा पूर्णपणे वेगळा भाग झाला. शपथ घेण्याच्या आधी आणि नंतर आम्ही काय बोललो याच्याशी त्याचा संबंध नाही. संसदेतही अनेक वेळा खासदार जय श्रीराम तसेच इतरही घोषणा देतात. यांचे म्हणणे मान्य करायचे झाले तर संसदच बरखास्त करावी लागेल असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.


























































