पालिकेने जप्त केलेल्या बेकायदा हातगाड्या जेसीबीने नष्ट करणार, दोन आठवड्यांत धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विविध भागांतील बेकायदा हातगाड्यांवर पालिकेने दोन आठवड्यांत धडक कारवाई करून तब्बल 3253 गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हातगाड्या अंधेरी पूर्व, कुर्ला आणि चेंबूर आदी भागांतून ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व गाड्या जेसीबीने नष्ट केल्या जाणार आहेत.

16 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत दोन आठवड्यांत 3 हजार 253 चारचाकी हातगाड्या जप्त करण्यात आल्या. सर्काधिक 319 हातगाड्या ‘के-पूर्व’ विभाग परिसरातून जप्त करण्यात आल्या आहेत. ‘के-पूर्व’ विभागामध्ये अंधेरी पूर्व, वोलेपार्ले पूर्व व जोगेश्वरी पूर्व परिसराचा समावेश होतो. याखालोखाल अनुक्रमे पालिकेच्या ‘एल’ विभाग परिसरातून 252 तर ‘एम-पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रातून 212 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‘एल’ विभाग परिसरात कुर्ला परिसराचा समावेश होतो तर ‘एम-पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रात चेंबूर, टिळकनगर परिसराचा समाकेश होतो. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन व फेरीवाल्यांचे नियमन आणि अनुज्ञापन खात्याचे उपायुक्त देकेंद्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

…म्हणून हातगाड्या नष्ट करणार!

जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत चारचाकी हातगाड्या दंड जमा करून सोडल्यास किंवा लिलावात विकल्यास त्या परत अनधिकृत व्यवसायांसाठी वापरल्या जात असल्यामुळे त्या जेसीबीने नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नष्ट करण्यात आलेल्या हातगाड्यांच्या अवशेषांचा भंगार म्हणून लिलाव करण्यात येणार आहे.