जानेवारीपासून मंडयांतील गाळय़ांची 50 टक्के भाडेवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पालिका आपल्या मंडयांमध्ये आणि गाळेधारकांना अनेक सुविधा देत असली तरी मिळणाऱया उत्पन्नात मात्र तब्बल 54 कोटी 96 लाखांची तूट आली आहे. त्यामुळे 22 वर्षांनी मंडयांतील गाळय़ांची 50 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये गाळय़ांच्या भाडय़ात प्रतिचौरस फुटाप्रमाणे दरवाढ करण्यात येईल.

पालिकेच्या बाजार खात्याच्या अखत्यारीत असणाऱया मंडयांतील गाळे, दुकाने भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात येतात. यामध्ये पालिकेने मंडयांचे भौगालिक स्थान, व्यवसायास असणाऱया संधीच्या पार्श्वभूमीवर ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. या गाळय़ांची भाडेवाढ स्थायी समिती ठराव क्र. 1235 दिनांक 10/10/1996 प्रमाणे निश्चित मंजूर करण्यात आली आहे. मात्र 2018 पर्यंत 22 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही पालिकेने ही भाडेवाढ केलेली नाही. मात्र मंडया सुस्थितीत ठेवणे, स्वच्छता राखणे आणि सुविधा देणे यासाठी होणाऱया खर्चात मात्र भरमसाट वाढ झाली आहे. यामध्ये मंडयांच्या परिरक्षणासाठी पालिकेच्या बाजार विभागास 2017-18 मध्ये 71 कोटी 64 लाख 83 हजार 967 इतका खर्च आला तर उत्पन्न 16 कोटी 67 लाख 95 हजार 008 इतकेच आले. म्हणजेच एकूण तूट 54 कोटी 96 लाख 88 हजार 959 इतकी प्रचंड आली. त्यामुळे अंदाजपत्रकात काही प्रमाणात समतोल राखण्यासाठी गाळय़ांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी होणार दरवाढ

 मंडईतील ‘मार्केटेबल’ व्हेज गाळय़ांचे सध्याचे 6 ते 8 रुपयांपर्यंत प्रतिमहा प्रतिचौरस फूट भाडे 9 ते 12 रुपये प्रति चौरस फूट होणार आहे. तर नॉनव्हेज गाळय़ांसाठीचे 7.50 ते 9 रुपये प्रतिचौरस फूट प्रतिमहा असणारे भाडे आता 11.25 ते 13.50 रुपये आणि ‘नॉन मार्केटेबल’ गाळय़ांसाठीचे 7.50 रुपयांपासून 12.50 रुपये प्रतिचौरस फूट असणारे भाडे आता 11.25 ते 18.75 रुपये प्रति चौरस फूट होणार आहे.

प्रतिवर्षी 5 टक्के भाडेवाढ होणार

पालिकेच्या माध्यमातून मंडईतील गाळेधारकांना सोयीसुविधा देणे आणि मंडईच्या देखभालीसाठी कोटय़वधीचा खर्च येतो. मात्र मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असते. यामुळे दरवर्षी 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

1996 नंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही, मात्र प्रतिवर्षी 10 टक्के याप्रमाणे भाडेवाढ झाल्यास तब्बल आठ पट भाडेवाढ करावी लागणार होती. ही भाडेवाढ सुसह्य करण्यासाठी पालिकेने दुप्पट भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता.

मात्र त्यालाही सर्वपक्षीयांनी जोरदार विरोध केल्यामुळे आता असणाऱया भाडय़ात 50 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे प्रतिवर्षी 5 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.