ICC Ranking विराटच ‘नंबर वन’चा ‘किंग’, स्मिथची घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा ‘नंबर वन’ स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला पछाडत विराट पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत विराटने चांगले प्रदर्शन केले. कोलकाता कसोटीत विराटने 136 धावांची शतकी खेळी केली होती आणि याचाच फायदा त्याला ताज्या क्रमवारीत झाला आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली 928 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे, तर स्टीव्ह स्मिथ 923 अंकांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये खास प्रदर्शन करू न शकल्याचा तोटा स्मिथला ताज्या क्रमवारीमध्ये झाला आहे. ब्रिसबेन कसोटीमध्ये स्मिथ फक्त 4 धावा करू शकला होता, तर अॅडलेड कसोटी त्याची उडी फक्त 36 धावांपर्यंत गेली होती.

‘नंबर वन’चा गेम
चेंडूशी छेडछाड केल्यामुळे एक वर्ष संघातून बाहेर राहिलेल्या स्मिथने झोकात पुनरागमन केले होते. इंग्लंडविरुद्ध अॅशेस कसोटी मालिकेत स्मिथने धावांचा अक्षरश: पाऊस पाडला होता आणि याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला होता. विराटला पछाडत स्मिथ नंबर वन बनला होता. तेव्हापासून कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानासाठी विराट आणि स्मिथमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती.

virat-kohli-smith-test

वॉर्नरची हनुमान उडी
पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड कसोटीतील नाबाद त्रिशतक ठोकणाऱ्या वॉर्नरने 12 अंकांची हनुमान उडी घेत पाचवे स्थान मिळवले आहे. तर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत दुहेरी शतक ठोकत टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. रूटला चार स्थानांचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा मात्र टॉप 10 मधून बाहेर फेकले गेले आहेत.

david-warner

ICC Test Rankings (Batsman)

1) विराट कोहली (928)

2) स्टीव स्मिथ (923)

3) केन विलियम्सन (877)

4) चेतेश्वर पुजारा (791)

5) डेव्हीड वॉर्नर (764)

6) अजिंक्य रहाणे (759)

7) ज्यो रूट (752)

8) मार्नस लाबुशाने (731)

9) हेन्री निकोलस (726)

10) दिमुथ करुणारत्ने (723)