आता रेशन दुकानावर चिकन, मटणही; केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आतापर्यंत रेशन दुकानातून नागरिकांना गहू, तांदूळ, डाळीचे प्रकार, साखर आणि रॉकेल इत्यादी सामान मिळत होते. मात्र यापुढे रेशन दुकानात आता स्वस्त दरामध्ये चिकन, मटन आणि अंडी देखील मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावर विचार करत असून लवकर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. गरिबांना पोषण आहार मिळावा म्हणून सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. अन्नधान्य अनुदानापोटी सरकारला मोठी तरतुद करावी लागते. या रेशन दुकानांवर आता पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार आहे. सुरवातीच्या टप्प्यात किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील, अशी माहिती मिळत आहे. याबाबत नीती आयोगाकडून योजना तयार करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेशन दुकानांमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची यादी व्यापक करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. याची सुरुवात किमान एक किंवा दोन प्रोटीनयुक्त खाद्यवस्तूंनी होईल. यात मटण, चिकन आणि अंडीचाही समावेश असेल.

अन्नधान्यांबाबत बहुतांश नागरिक स्वयंपूर्ण आहेत, मात्र तरीही देशात कुपोषण आणि अॅनिमियासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाकडून विचार सुरु आहे. पुढील 15 वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवले जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट 1 एप्रिल 2020 पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.