
मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटरसह इतर तिघा पालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाने आज जामीन मंजूर केला. प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आरोपींची सुटका केली.
14 मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटी स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे सातजणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 31 जण जखमी झाले. ठेकेदार तसेच पालिका अधिकाऱयांनी चुकीचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई यांच्यासह पालिकेचे सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असेलेले संदीप काकुळते, पालिकेतील कार्यकारी अभियंता अनिल पाटील आणि निवृत्त मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींनी आपल्या सुटकेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला, मात्र सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने आरोपींचा अर्ज स्वीकारत त्यांचा जामीन मंजूर केला.

























































