
>> प्रसाद शिरगांवकर
टिकटॉकच्या झंझावाताने जगभरातल्या कोटय़वधी तरुणांना आपल्या कवेत घेतलं आहे. मोबाईलवर सतत आकर्षक आणि मनोरंजक कंटेंट हवा असलेल्या, डिजिटल युगातल्या नव्या पिढीच्या टिकटॉक वेडाचं पुढे काय होईल माहीत नाही. याहून वेगवान, आकर्षक दिसणारं नवं काही येईल आणि टिकटॉक वेड मागे पडेल कदाचित. पण हा वेग, आकर्षकता आणि त्यातून निर्माण होणारा उथळ कंटेंट आणि क्षणभराच्या सेलिब्रिटीपणाचं आकर्षण याने ही नवी पिढी कोणत्या दिशेने जात आहे हे सांगता येणं कठीण आहे.
एका ग्रामीण तरुण जोडप्याचा एक व्हिडीयो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ‘मैने प्यार किया’ सिनेमातल्या ‘दिल दिवाना’ गाण्यावर या तरुण जोडप्याने केलेल्या नाचाचा छोटा व्हिडीयो होता तो. अभिनय, नृत्य यांचं काहीही प्रशिक्षण नसलेल्या त्या जोडप्याचा साधाच, पण अत्यंत निरागस व्हिडीयो होता तो. त्यांनी TikTok नावाच्या नव्या सोशल मीडिया ऍपमध्ये तो प्रकाशित केला होता आणि तिथून तो देशभर व्हायरल झाला, अनेक सेलिब्रिटीजनी तो शेअर केला आणि त्याचं कौतुकही केलं.
हे एकच उदाहरण नाही. हल्ली ‘टिकटॉक’वर प्रकाशित होणाऱया आणि मग तिथून दुसरीकडे जाऊन व्हायरल होणाऱया व्हिडीयोचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही महिन्यांपूर्वी ‘टिकटॉक’वर चेन्नई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती आणि महिन्याच्या आत ती बंदी मागेसुद्धा घेतली. सध्या भारतासह जगभर प्रचंड वेगानं वाढणारं आणि तरुणाईमध्ये अफाट लोकप्रिय असलेलं हे सोशल मीडिया ऍप नेमकं काय आहे आणि इतकं लोकप्रिय का होत आहे हे समजून घेऊया.
टिकटॉक काय आहे?
टिकटॉक हे शॉर्ट व्हिडीयो शेअरिंगवर आधारित सोशल मीडिया ऍप आहे. जसं आपण फेसबुकवर स्टेटस अपडेटस् किंवा शेअर करतो, इन्स्टाग्रामवर फोटोज शेअर करतो तसं टिकटॉकवर व्हिडीयो शेअर केले जातात. हे व्हिडीयो टिकटॉक वापरणाऱया युजर्सनी स्वतः तयार केलेले असतात. टिकटॉकमध्ये छोटय़ा लांबीचे व्हिडीयो असतात, फक्त 15 सेकंदांचे! व्हिडीयोज तयार करून ते अपलोड आणि शेअर करण्याच्या सुविधा त्या ऍपमध्येच असतात आणि त्या वापरणं अत्यंत सोपं असतं. व्हिडीयोमध्ये वापरण्यासाठी असंख्य लोकप्रिय गाण्यांच्या आणि संवादांच्या ऑडियो क्लिप्स टिकटॉकमध्ये मिळतात. त्या क्लिप्स वापरून त्यावर स्वतःचा छोटासा व्हिडीयो तयार करणं कोणालाही सहज जमू शकतं.
या सर्व वैशिष्टय़ांमुळे टिकटॉक अल्पावधीत कमालीचं लोकप्रिय झालं आहे. आजमितीस टिकटॉकचे जगभरात 50 कोटीहून जास्त वापरकर्ते आहेत, यातले तब्बल 20 कोटी हिंदुस्थानी आहेत! टिकटॉकची लोकप्रियता तरुणाईमध्ये जास्त आहे. त्यांचे सुमारे 66 टक्के वापरकर्ते तिशीच्या आतले आहेत आणि साठ टक्के 16 ते 24 वर्ष वयोगटातले!
टिकटॉकवर काय असतं?
टिकटॉकवरचे बहुसंख्य व्हिडीयो हे ‘धमाल टाईमपास’ प्रकारचे असतात. विनोद, विडंबनं, मजेशीर नाच, शाब्दिक कोटय़ा, pranks असे विनोदाचे असंख्य प्रकार ह्या व्हिडीयोमध्ये दिसतात. यामध्ये लोकप्रिय हॉलीवूड / बॉलीवूड गाण्यांवर केलेल्या मजेशीर नाचांपासून ते फोनवरच्या विनोदी संवादांपर्यंत आणि एखाद्या नाटुकल्यातून सादर केलेल्या विनोदापासून ते चुटकुले-विनोदांपर्यंत काहीही सापडतं. मात्र, ह्या विनोदी व्हिडीयोबरोबरच धावत्या गाडीतून चढणे-उतरणे, रहदारीच्या रस्त्यात मधोमध नाचणे, भर चौकात काही धाडसी कृत्यं किंवा माकडचाळे करणे असे चित्रविचित्र साहसी (?) स्टंट्स असलेले व्हिडीयोही इथे असतात. जे व्यक्त करायचं आहे ते केवळ 15 सेकंदात करायचं असल्याने खूप मोठा जीव असलेला आशय मांडता येत नाही, पण छोटा जीव असलेले असंख्य आशय-विषय इथे मांडलेले दिसतात. हे व्हिडीयो जगभरातले युजर्स स्वतः तयार करून शेअर करत असतात, त्यांना आशय-विषयाचं कोणतंच बंधन नसतं. यामुळे, नग्नता-अर्धनग्नता असलेले किंवा अश्लीलता असलेले व्हिडीयोजही काही युजर्स येथे शेअर करत असतात. टिकटॉकवर येणाऱया नग्नता आणि अश्लीलता असलेल्या व्हिडीयोजमुळे त्यावर खूप मोठय़ा प्रमाणावर टीका झाली, होत आहे. याच मुख्य कारणामुळे हिंदुस्थानात त्यावर बंदी घातली गेली होती. मात्र असे व्हिडीयो सेन्सॉर करून ते काढून टाकण्याचं वचन टिकटॉकने दिल्यानंतर ही बंदी मागे घेतली गेली. (त्यानंतर सुमारे 70 लाख व्हिडीयोज टिकटॉकने काढून टाकले म्हणे!)
टिकटॉक तरुणाईमध्ये लोकप्रिय का?
आजच्या तरुणाईला फेसबुक हे अत्यंत बोअरिंग वाटतं! फेसबुक हे मोठय़ा माणसांचं, मोठमोठय़ा पोस्ट्स टाकून राजकीय-जातीय भांडणं करण्याचं ठिकाण आहे असं त्यांना वाटतं. (अर्थात यात बरचंसं तथ्य आहेच!!) बहुसंख्य तरुणाई फेसबुकऐवजी इन्स्टाग्रामवर जास्त रमते. तिथे फक्त फोटो टाकायचे असतात, चर्चा-वादावादी-भांडणं-ट्रोलिंग ही भानगड नसते आणि याच कारणांमुळे तरुणाईला टिकटॉकही आवडत आहे. अत्यंत छोटे, धमाल टाईमपास असलेले आणि डोक्याला काही ताप न देणारे व्हिडीयो हे याचं मुख्य आकर्षण आहे. शिवाय कोणालाही व्हिडीयो तयार करणं शक्य झाल्याने तरुणाईला आपल्यातल्या सृजनशीलतेला वाव मिळतो असं वाटतं. एखाद्या प्रसिद्ध गाण्यावर आपणही नाच करू शकतो किंवा आपल्याला सुचलेल्या एखाद्या विनोदाचा व्हिडीयो करून पोस्ट करू शकतो हे त्यांना खूप आवडत आहे. आपल्या सृजनशीलतेला आणि अभिव्यक्तीला नवं व्यासपीठ मिळालं आहे असं वाटत आहे.
टिकटॉक हे सोशल मीडिया ऍप असल्याने, व्हिडीयोज ‘लाईक’ करणे, त्यावर कमेंट करणे आणि ते शेअर करणे हे सारं ऍपमधूनच करता येतं. इतर सोशल मीडियासारखंच, इथे इतरांना ‘फॉलो’ करता येतं आणि अधिकाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती इथल्या ‘सेलिब्रिटीज’ होतात. आणि आपणही असे इन्स्टंट सेलिब्रिटी होऊ शकतो असं तरुणाईला वाटतं म्हणून हे ऍप कमालीचं लोकप्रिय होत आहे. यातही ग्रामीण भागातल्या किंवा कष्टकरी वर्गातल्या युवकांमध्ये टिकटॉकच्या लोकप्रियतेचं प्रमाण जास्त आहे.
टिकटॉकच्या झंझावाताने जगभरातल्या कोटय़वधी तरुणांना आपल्या कवेत घेतलं आहे. खिशामध्ये सतत मोबाईल फोन असलेल्या आणि सतत आकर्षक आणि मनोरंजक कंटेंट हवा असलेल्या, डिजिटल युगातल्या नव्या पिढीच्या, या टिकटॉक वेडाचं पुढे काय होईल माहीत नाही. याहून वेगवान, याहून आकर्षक दिसणारं नवं काही येईल आणि टिकटॉक-वेड मागे पडेल कदाचित. पण हा वेग, आकर्षकता आणि त्यातून निर्माण होत राहाणारा उथळ कंटेंट आणि क्षणभराच्या सेलिब्रिटीपणाचं आकर्षण याने ही नवी पिढी कोणत्या दिशेने जात आहे हे सांगता येणं कठीण आहे.
जगभरातल्या तरुणाईला भुरळ घालणाऱया टिकटॉकच्या विश्वात सर्वकाही आलबेल नाही. इतर ऑनलाईन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर येत असलेल्या समस्या टिकटॉकवरही येऊ लागल्या आहेत आणि काही नव्या समस्याही समोर येत आहेत. टिकटॉकवर अत्यंत आकर्षक कंटेंट असल्याने, त्याचं लागू शकणारं व्यसन ही पहिली मोठी समस्या. हातातल्या मोबाईलवर वेळ मिळेल तेव्हा असंख्य निरर्थक व्हिडीयो तासनतास बघत बसणं ही टिकटॉकचं व्यसन लागलेल्याची सवय बनते. हे काहीसं निरुपद्रवी वाटू शकतं, पण दिवसेंदिवस, तासन्तास अत्यंत उथळ आशयाचा कंटेंट बघत राहाण्याने बौद्धिक आणि भावनिक विकासावर काय नकारात्मक परिणाम होईल हे आज माहीत नाही.
टिकटॉकचं दुसऱया प्रकारचं व्यसन म्हणजे, सतत काहीतरी नव्या प्रकारचे व्हिडीयोज तयार करत राहण्याचं व्यसन. यातही कलात्मकतेपेक्षा जास्तीत जास्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी अचकट-विचकट करणे किंवा अतिसाहसी काहीतरी करणे याचं प्रमाण, व्यसन लागलेल्या लोकांमध्ये वाढत जातं असं दिसतंय. यामधून अश्लील-अश्लाघ्य व्हिडीयोज तयार करण्यापासून ते साहसी व्हिडीयो करताना अपघात होऊन क्वचित जीव गमावण्याच्याही घटना घडत आहेत.
शिवाय, अश्लीलता, लहान मुलांना टार्गेट करणे आणि सायबर बुलिंगसारख्या इतर व्यासपीठांवर असलेल्या समस्या टिकटॉकवरही दिसायला लागल्या आहेत.
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)



























































