
जिल्हा सहकारी बँक श्रीरामपुर शाखेच्या तांत्रीक चुकीमूळे वाकडी (ता. राहाता) येथील 11 शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहीले आहेत. पिकविम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरूवारपासून बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदाशीव बधे व विजय जोशी या शेतकऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हा इशारा देण्यात आला आहे.
सदाशिव बधे, शारदा बधे, संजय बधे, उदय बधे, अनुराधा बधे, विजय जोशी, विजया बधे, प्रमोद होले, पुजा होले, सुमित आहेर, तात्यासाहेब आहेर या कर्जबाजारी पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा हवामान अधारीत पिक विमा बँकेने भरला. विमा भरताना शेतकरी राहाता तालुक्यातील वाकडी गावातील व पुणतांबा सर्कलमधील असताना पिक विमा फॉर्म भरताना तो गाव व सर्कल श्रीरामपूर असा भरल्याने हा विमा मिळाला नाही. ही चूक बँकेची असताना भुर्दंड मात्र शेतकऱ्यांना बसला. या प्रश्नी वारंवार पाठपूरावा करूनही बँकेने याची दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत कार्यालय अधिक्षक विशाल ठाकूर यांनी या प्रश्नी जिल्हा बँकेने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून बँकेच्या तांत्रीक चुकीमुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही,तर ती अदा करावी. तात्काळ कार्यवाही करून या प्रकरणाचा निपटारा करावा असा आदेश 23 आक्टोबर 2019 रोजी देऊनही अद्यापपर्यंत बँकेने या शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या पैशासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे शेतकरी गुरूवारी श्रीरामपुर शाखेत जाऊन आंदोलन करणार असून पैसे मिळत नाही तोपर्यंत बँकेत बसून राहतील असा इशारा प्रसिध्दी पत्रकात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती नगर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक,नगर जिल्हा उपनिबंधक , जिल्हा कृषी अधिक्षक, जिल्हा बँक अध्यक्ष यांना पाठवण्यात आल्या आहेत.



























































