
>> प्रभाकर पवार
गेल्या आठवडय़ात याच सदरात (याच दिवशी) समलिंगी (Lesbian, Gay, Bisexual, Transgender and Queer) व्यक्तींमधील लैंगिक संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्याच दिवशी एका इंग्रजी सायं. दैनिकामध्ये मुंबईतील इंटरनॅशनल बोर्डाच्या एका प्रतिष्ठत शाळेतील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या आठ मुलांना शाळेतून निलंबित करण्यात आल्याची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी वाचून अनेक पालकांच्या हृदयाचे ठोके चुकले.
एका आईने आपल्या मुलीच्या मोबाईलमधील व्हॉट्सऍप चॅट वाचल्यानंतर शाळेतील वाह्यात मुले कोणत्या थराला गेली आहेत हे उघडकीस आले. त्या चॅटमध्ये अमुक अमुक मुलगी लेस्बियन आहे. तो मुलगा ‘गे’ आहे. बायोसेक्स्युअल आहे, असे उल्लेख तर होतेच, परंतु त्यात Gang Bang चीही धमकी मुलींना देण्यात आली होती. 13 ते 14 वर्षे वयोगटातील ही मुले आवडणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याची (Gang Bang) धमकी देतात, हे फारच धक्कादायक आहे. व्हॉट्सऍपमध्ये समलिंगी मुलांमुलींवरही शेरेबाजी करण्यात आली आहे. मिसरूडही न फुटलेली ही पोरं शाळेतच बलात्काराच्या चर्चा करतात, मुलींना धमक्या देतात हे वाचून त्या मुलीच्या आईला प्रचंड धक्का बसला. व्हॉट्सऍपवर आलेले मॅसेज वाचून बऱ्याच मुली घाबरल्या होत्या. त्यांनी कुठेही तक्रार केली नव्हती; परंतु एका मुलीच्या आईने धाडस करून मुंबईतील या नामांकित शाळेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली. त्यानंतर आठ मुलांना शाळेतून निलंबित करण्यात आले. म्हणून काही असे प्रकार थांबतील अशी कुणी अपेक्षा करू नये. कारण ज्या मुलां-मुलींकडे मोबाईल आहेत, स्मार्ट फोन आहेत, त्या माध्यमातून संवाद साधून मुला-मुलींची छेड काढली जाणार आहे.
मोबाईलमधील व्हिडीयो ‘गेम’ खेळून खेळून मुले आज मोठय़ा प्रमाणात हिंसक बनू लागली आहेत. खून, रेप हे त्यांचे रोजचे परवलीचे शब्द झाले आहेत. मोबाईलमध्ये जसे गेम खेळले जातात तशी कृती करण्याचा प्रयत्न आजची मुले प्रत्यक्षात करू लागली आहेत. त्यामुळेच झपाटय़ाने सर्व स्तरावरील गुन्हेगारी वाढत आहे. मोबाईल ‘गेम’मुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. ड्रग्जपेक्षाही हा भयानक रोग आहे. तहान-भूक विसरून बरेचजण मोबाईल गेमच्या आहारी जात आहेत. त्यामुळे आपल्याच वर्गातील मैत्रिणीवर व्हॉट्सऍप ग्रुपवर ‘रेप’ करण्याची भाषा आजची शालेय मुले करीत आहेत. तर लंपट शिक्षकही शाळा-कॉलेजात कमी नाहीत. गेल्याच आठवडय़ात जालन्यामध्ये एका क्रीडा शिक्षकाने नववीमधील मुलीवर बलात्कार केला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासला. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी पार्कसाईड येथे एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तिच्या अंगावर ऍसिड फेकले या आरोपावरून एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून देशाची स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. लंपट शिक्षक, टारगट मुले तसेच LGBTQ ही कम्युनिटी आज सर्वच शाळा-कॉलेजमध्ये आहे. त्यांच्यातील अतिरेक्यांकडून सामान्य मुलामुलींचे कसे संरक्षण होणार या चिंतेत आज पालक आहेत. बाल गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तर पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. काय होणार आहे या पिढीचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सेक्स व व्हायलन्सशिवाय कुणी बोलतच नाही.
शाळेत जाणारी कोणतीच मुलं आज सुरक्षित नाहीत, नव्हे काल-परवा जन्माला आलेली मुलंही! गेल्याच आठवडय़ात मुंबईतील मालाड-मालवणी येथील एका शाळेत एका दुसरीमधील मुलीची तिच्याच वयाच्या त्याच शाळेतील मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये घुसून लैंगिक छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने त्या मुलावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. तेव्हा लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत कुणावरही महिलांनी विश्वास ठेवू नये. कोर्टानेही महिलांवरील अत्याचाराचे खटले लवकरात लवकर निकाली काढून आरोपींना निर्दयपणे शिक्षा देण्याचे ठरविले आहे. दोन दिवसांपूर्वीच लहान मुलींच्या व महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्ती या सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक असून या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
आपल्या हातातील स्मार्ट फोन हे गुन्हेगारीचे ‘जनक’ झाले आहे. ‘यू टय़ुब’वर आज हवी ती माहिती मिळते. अश्लील चित्रफिती पाहता येतात. लोक ऍडिक्ट झाले आहेत. मोबाईलवर तासन्तास चॅटिंग करणाऱ्या पत्नीला घटस्फोट दिला जात आहे. प्रसंगी शीघ्रकोपी पतीकडून तिचे बरे-वाईट केले जात आहे. खुनाच्याही घटना घडत आहेत. चॅटिंगला विरोध केला म्हणून मुलगा बापाला ठार मारत आहे. मोबाईलचे व्हिडीयो गेमचे व्यसन आज साऱयांना विनाशाकडे घेऊन जात आहे. तेव्हा शाळा-कॉलेजात आता मोबाईलवर बंदी घालणेच योग्य ठरेल. नाहीतर आजच्या कळय़ा उमलण्यापूर्वीच त्या उद्ध्वस्त होतील हे लक्षात ठेवा. आज सात-आठ वर्षांची मुलेही मुलींचा पाठलाग करू लागली, शाळेतील महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून तिच्याशी छेडछाड करू लागली तर आपण याला कोणती अवस्था म्हणावी? हे मोबाईलमधील व्हिडीओ गेमचेच परिणाम आहेत ना? तेव्हा पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे हे किती घातक व धोकादायक आहे हे ओळखावे आणि सावध व्हावे. अन्यथा मोबाईलवर रोज खेळणारे तुमचे मूल वयात येण्यापूर्वी कामातून गेलेच म्हणून समजा.






























































