
>> डॉ. विद्या देवधर
अडचणीत सापडलेल्या महिलांना त्वरित मदत मिळावी म्हणून तेलंगणामध्ये she टीम कार्यरत झाली आहे. रचकोंडाचे पोलीस कमिशनर श्री. महेश भागवत व अतिरिक्त पोलिस आयुक्त स्वाती लाकरा यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये पोलिसांच्या she टीमचे काम सुरू आहे. हैदराबादेतील ‘दिशा’च्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी अशा टीमचं कार्य निश्चितच अनमोल आहे.
तरुण मुलीचे असे हे एक साधे स्वप्न, पण तेही पूर्ण होणे कठीण असे तिला वाटते. असे चौरस्त्यावर चहा पिणे तर दूरच राहिले, पण कामावर जाता येताना, बसमधून जाताना, अनेक वेळा अनेक ठिकाणी पुरुषांच्या नजरा, त्यांचे सहेतुक स्पर्श ती दुर्लक्षित करते, पण तरीही तिच्यावर कुणी पाळत ठेवते, चार जण मिळून तिला अडचणीत पकडतात आणि पुढे बरंच काही सोसत नंतर मृत्यूही. असे भयानक वास्तव समोर येते तेव्हा पसरलेले भीतीचे वातावरण हैदराबादकरांनी आणि देशानेही अनुभवले आहे. पकडलेल्या त्या चार गुन्हेगारांना त्वरित शिक्षा मिळावी म्हणून देशभरातून वाढत चाललेला आग्रह आणि त्यानंतर एका सकाळी आली ती एनकाऊंटरची बातमी. ‘‘फार चांगले झाले’’ हीच प्रतिक्रिया सर्वदूर उमटली. न्यायव्यवस्था आणि घटनेचे हक्क मान्य असूनही कायद्याच्या चौकटीत गुन्हेगाराला वेळीच देहांत शासन झाले याबद्दल समाधानाचा सूर उमटला.
महिलांसंबंधित दुर्दैवी घटना सतत आपल्या कानावर येत असतात. यावेळी हैदराबादमध्ये हा प्रसंग घडला असला तरीही आमचे शहर फार सुरक्षित आहे असे आम्हाला वाटते. अडचणीत सापडलेल्या महिलांना त्वरित मदत मिळावी म्हणून येथे she टीम कार्यरत आहे. 2014 च्या ऑगस्ट महिन्यात additional C.P स्वाती लाकरा यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये पोलिसांच्या she टीमचे काम सुरू झाले. महिलासंबंधित गुह्यांचा शोध घेऊन स्वतःच्या अखत्यारीत तक्रार नोंदवून घेणे व त्यासंबंधी कार्यवाही करणे हे she टीमचे उद्दिष्ट आहे. या नवीन उपक्रमाच्या योजनेपासून रचकोंडाचे पोलीस कमिशनर श्री. महेश भागवत त्याच्याशी संबंधित आहेत. उद्दिष्टांचा सर्वांगीण विचार, अभ्यास व संशोधन केल्यानंतर 2014 मध्ये she टीम कार्यरत झाली होती. 1 जुलै 2016 रोजी सायबराबाद क्षेत्राचे विभाजन होऊन पूर्व सायबराबाद व यादरी, भुवनगिरी या भागांसाठी रचकोंडा पोलीस कमिशनरेट सुरू झाले. त्याचे पहिले कमिशनर म्हणून महेश भागवत यांची नेमणूक झाली.
श्री. महेश भागवत हे तेलंगणातील अतिशय कार्यक्षम पोलीस कमिशनर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि प्रत्येक चांगल्या मराठी उपक्रमाला प्रोत्साहन देणारे व सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे हे लोकप्रिय मराठी रसिक व्यक्तिमत्त्व आहे. आदिलाबादमध्ये नक्षलवाद्यांचे यशस्वीपणे पारिपत्य करून या पोलीस अधिकाऱयाची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर महिला व मुलांची अवैध वाहतूक आणि त्यावरील कठोर कारवाई यासाठी त्यांचे नाव गौरवाने घेतले जाऊ लागले. यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. याच विषयासाठी trafficking in person ,TIP हिरो पुरस्काराने 2017 मध्ये त्यांचा जगभरातील निवडक सात हिरोंबरोबर अमेरिकेत सन्मान करण्यात आला होता. स्त्रियांना व मुलांना संरक्षण देणे, त्यांची संकटकाळी सोडवणूक करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे यासंबंधातील त्यांचे कार्य फार मोलाचे आहे.
कमिशनर महेश भागवत यांच्या सायबराबाद भागात she टीमचे कार्य अधिक लोकाभिमुख झाले आहे. आज तेलंगणातील प्रत्येक जिह्यात, विविध क्षेत्रांतील विविध पातळ्यांपर्यंत she टीम पोहोचली आहे. महिलासंबंधित गुह्यांवरच कार्यवाही करणे हे आणि एवढेच she टीमचे कार्यक्षेत्र आहे. मुलींचा होत असलेला पाठलाग, बालविवाह, विनयभंग किंवा सडक सख्याहरींना रोखण्याचे काम she टीम करते. त्याशिवाय महिलांची अवैध तस्करी, बार किंवा कुंटणखान्यातील गैरव्यवहार अशा अनेक वाईट गोष्टींचा छडा लावण्याचे काम she टीमने केले आहे. तेलंगणात अजूनही बालविवाह मोठय़ा प्रमाणात होतात. गेल्या साडेतीन वर्षांत 69 बालविवाह थांबवले गेले. यावरून या विशेष कार्यपथकाची कार्यक्षमता तर लक्षात येतेच, पण आवश्यकतासुद्धा जाणवते. रंगारेड्डी, मेडचल, यादगिरी या हैदराबाद भोवतालच्या जिह्यांत she टीम काम करते. 42 लक्ष लोकांपर्यंत ही विशेष सेवा पोहोचली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीचे, बी. अनुषा हिचे 26 वर्षांच्या माणसाशी ठरवले होते ते लग्न या महिला पथकाने थांबवले. पुढे ही अनुषा 2017 मध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर चमकली. 2019च्या ऑगस्टमध्ये she टीमने 4-13 वयोगटातील 30 मुलांना यादगीरगुट्टाच्या ब्रॉथेल्समधून सोडवले आहे. यादगीरगुट्टा हे प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथे देवदासींचा प्रश्न मोठा असून त्या मुलींना व मध्यस्थांचे काम करणाऱया ‘भडव्यां’ना सोडवून त्या सर्वांच्या पुनर्वसनाचे फार मोठे काम श्री. महेश भागवत अनेक वर्षे करीत आहेत. या she टीममुळे महिलांना संरक्षण देण्याची, मदत करण्याची व्याप्ती वाढली आहे.
हैदराबाद, सायबराबाद व रचकोंडानंतर आता तेलंगणातील प्रत्येक जिह्यात she टीम कार्यरत आहे. कॅमेरे व शस्त्रs यांच्या सहाय्याने अधिकाधिक गुह्यांना आळा घालणे शक्य झाले आहे. additional d. c. p. एस . के. सलिमा यांच्या नेतृत्वाखाली या she टीमचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. एका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील गैरव्यवहारांची कुणकुण लागताच या पथकाने तेथे विशेष लक्ष दिले आणि दवाखान्यातील सेक्स रॅकेट उघडे पडले. साध्या वेषात वावरणाऱया या पथकाला कोणी ओळखू शकत नाही. पुरावे गोळा करण्यापासून ते गुन्हेगारांना पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य कारवाई होईपर्यंत she टीम त्या घटनेचा पाठपुरावा करते. वीटभट्टीवरील महिला व मुलांवरील अन्याय व अत्याचार, घरगुती हिंसाचार आणि बालमजुरी या सर्वच ठिकाणी श्री. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील she टीम गुन्हेगारीला वचक बसवण्याचे काम करीत असते. अवेळी आणि आडरस्त्याला स्कूटर बिघडली, पंक्चर झाली तर she टीम मदतीला धावून येते. नोव्हेंबरमधील हैदराबादेतील दुर्घटनेनंतर या सेवेचा अधिकाधिक लाभ नागरिक घेऊ लागले आहेत. मदत मागितल्यानंतर पाचदहा मिनिटांत she टीमचे दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचले व वाहनचालक निर्धास्त झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी मागणी केल्यास she टीम लगेच आयाबहिणींच्या मदतीसाठी तत्परतेने तेथे पोहोचत. त्यासाठी 949067111 हा व्हॉट्सऍप कंट्रोल नंबर आहे. तो फोनमध्ये असावा किंवा 100 क्रमांकावर मदत मागितली तरी कंट्रोल रूममधून ताबडतोब she टीमपर्यंत निरोप पोहोचवला जातो.
‘‘आमच्याकडे अनेक कायदे आहेत. त्यांची योग्य व जलद पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. न्याय मिळेलच अशी लोकांची खात्री झाली पाहिजे हा विश्वास she टीमने मिळवला आहे’’ असे श्री. भागवत सांगतात. she टीमची नवी कल्पना – ‘तिच्यासाठी ती.’ कॉलेजमधील काही धीट व उत्साही मुलींना येथे सामील करून घेतले आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये दोन स्वयंसेविकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. या मुली she टीमच्या जणू डोळे व कानच बनल्या आहेत. ज्या मुलीला मुले त्रास देत आहेत, चिडवत आहेत किंवा कुणी एखादीशी अतिप्रसंग केला तर या स्वयंसेविका त्या घाबरलेल्या मुलीला आधार देतात, कसा सामना करायचा हे शिकवतात आणि she टीमलाही कळवतात. महिला हवालदार त्या अडचणीतील मुलीला भेटतात. तिच्याशी बोलून प्रश्न सोडवतात. तिला होत असलेला त्रास कुणालाच, अगदी घरीही कळू देणार नाही असे आश्वासन देतात, नाहीतर त्या मुलीचे शिक्षण थांबू शकते याची भीती मुलीला व पोलिसांना असतेच. गुन्हेगारांना तर पकडतातच, पण नुसता दम देऊन सोडून देत नाहीत, तर त्यांचे घरच्यांसमोर समुपदेशन करतात. तसेच पुढील तीन, चार महिने स्थानिक पोलीस त्यांच्यावर लक्षही ठेवतात. आपण वाईट वागू नये याची जाणीव मुलांना करून देतानाच घरच्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्याचे मोठे समाजकार्य पोलीस करीत आहेत. ‘भूमिका वुमन्स कलेक्टिव्ह’ ही सेवाभावी संस्था समुपदेशनाचे काम करते. गुन्हेगारांची चूक त्यांना समजली की, त्यांची वागणूक बदलेल हे लक्षात घेऊन ही संस्था तसे गुन्हेगारांकडून वदवून घेते.
मुलींनी एकमेकींना आधार देणे व तक्रार करण्याची हिंमत बाळगणे हीच she टीमची प्रेरणा आहे. श्री. भागवतांच्या मार्गदशनाखाली महाराष्ट्रातही अशी पथके आता तयार झाली आहेत. पुणे (ग्रामीण), सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह काही शहरांत आता मुलींना आधार देणारी, त्यांच्या सहकार्याने अडचणीतील मुलीला सोडवणारी यंत्रणा आता कार्यरत होऊ घातली आहे. बाईकडे वाईट नजरेने पाहण्याची इच्छा कोणी करू नये आणि अशा लोकांची इच्छा असफल होईल अशी तयारी she टीम करून घेत आहे. या प्रयत्नांना यश लाभो.
पोलिसांनी रस्त्यावरील धोक्याची ठिकाणे शोधून तेथे सतत गस्त घातली जाईल अशी व्यवस्था केली आहे. त्यासाठी Hawkeye हे ऍप सुरू केले आहे. त्यावर तुमच्या प्रवासाचा मार्ग घालायचा. ऑटो किंवा टॅक्सीचा फोटो पाठवायचा. यानंतर पोलीस तुमच्यावर लक्ष ठेवतील व इमर्जन्सी बटन दाबले की, गस्त घालणारी पोलिसांची फिरती गाडी त्वरित तुमच्याजवळ पोहोचेल.




























































